Belgaum News : गळतगा येथे दुचाकीला चुकविताना बस नाल्यात उलटली; प्रवाशांसह दुचाकीस्वार जखमी | पुढारी

Belgaum News : गळतगा येथे दुचाकीला चुकविताना बस नाल्यात उलटली; प्रवाशांसह दुचाकीस्वार जखमी

गळतगा : पुढारी वृत्तसेवा : भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराला चुकविताना बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूस असलेल्या नाल्यात पलटी झाली. ही घटना गळतगानजीक आज (दि.२७) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून बसमधील दोघा प्रवाशांच्या छातीला मार लागला आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली. रमेश चव्हाण (मुळगाव हुपरी, सध्या रा. गळतगा) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. (Belgaum News)

जखमींना रुग्णवाहिकेतून निपाणी महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये तब्बल 73 प्रवासी होते. निपाणी आगाराची बस (केए 23 एफ 0878) इचलकरंजीला जाऊन निपाणीकडे परत येत असताना गळतगा-भीमापूरवाडी मार्गावर खणीजवळ आल्यावर निपाणीकडून गळतगाकडे भरधाव वेगाने दुचाकीस्वार (केए 23 ईएल 3364) येत होता. दुचाकीला वाचविण्याच्या नादात बसचालक आर. ए. बंदी (रा. नवलिहाळ) यांचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याकडेला असलेल्या नाल्यात कोसळली. (Belgaum News)

या अपघातात दुचाकीस्वार रमेश चव्हाण याच्या डोक्याला गंभीर मार बसला आहे. बस नाल्यात पलटी झाल्यावर बसमधील प्रवाशांनी आरडाओरड केली. लगेचच गळतगा बसस्थानकावर असलेले अलगोंडा पाटील, संजय कागे, मिथून पाटील, राजू उपाध्ये, बाबासाहेब पाटील, भरत नसलापुरे, बसवराज पाटील, राहूल वाकपट्टे, विजय तेलवेकर, संतोष हुनसे, राजू कमतनूरे, रवी शास्त्री, गिरिष पाटील, विनोद तेलवेकर व नागरिकांनी धाव घेऊन बसच्या वरती चढून प्रवाशांना बाहेर काढले.

बसमधील महिला व एका पुरुषाला छातीला मार लागल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून निपाणी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये असलेल्या एकूण 73 प्रवाशांपैकी अनेकांना किरकोळ दुखापत झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी गर्दी कमी करून रस्त्यावरील वाहनांना मार्ग मोकळा करून दिला. निपाणी आगाराचे व्यवस्थापक संगाप्पा बजन्नावर व रवी शास्त्री यांनी भेट देऊन सर्व प्रवाशांना दुसऱ्या बसमधून प्रवाशांना पाठविले. या घटनेची नोंद सदलगा पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा 

Back to top button