बेळगाव : शहापूरला चुलतभावाचा निर्घृण खून | पुढारी

बेळगाव : शहापूरला चुलतभावाचा निर्घृण खून

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : मालमत्तेच्या वादातून चाकूने वार करून चुलतभावाचा निर्घृण खून केल्याची घटना रविवारी (दि. 28) दुपारी 3.15 च्या सुमारास होसूर बसवाण गल्लीत घडली. मिलिंद चंद्रकांत जाधव (वय 28, रा. होसूर बसवाण गल्ली, शहापूर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा चुलतभाऊ अभिषेक अशोक जाधव (रा. होसूर बसवाण गल्ली, शहापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, जाधव कुटुंबीयांत मालमत्तेचा वाद होता. अभिषेकचे वडील समर्थनगरमध्येे राहतात. तर मिलिंद व त्याची आई दोघेच होसूरमध्ये आहेत. मिलिंद व अभिषेक यांच्यात गेल्यात अनेक वर्षांपासून मालमत्तेचा वाद आहे. रविवारी दुपारी 3.15 च्या सुमारास यातूनच दोघा भावांमध्ये वाद झाला. यावेळी अभिषेकने चाकूने मिलिंदच्या छातीवर वार केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या मिलिंदला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचाराचा उपयोग न होता दुपारी चारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

घटनेची ही माहिती मिळताच शहापूर पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक बी. ए. जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली. प्राथमिक माहितीनुसार हा खून मालमत्तेच्या वादातून झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणातील संशयित अभिषेकला चाकूसह ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाच्या नोंदीची प्रक्रिया सुरु होती.

Back to top button