येथे बैल नव्हे, गायच येते जन्माला! | पुढारी

येथे बैल नव्हे, गायच येते जन्माला!

हुबळी; पुढारी वृत्तसेवा :  मादी वासरांमुळे शेतकर्‍यांना उत्पन्न मिळत असल्याने आपल्या गायीला मादी वासरुच व्हावे, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा असते. यांत्रिकीकरणामुळे नर वासरे हे शेतकर्‍यांसाठी ओझे ठरत आहेत. त्यामुळे आता नव्या तंत्रज्ञानामुळे शेतकरी वासराचे लिंग निवडू लागले आहेत. त्यामुळे दुधाचे उत्पादनही वाढू शकते. मात्र नैसर्गिक उत्पत्तीत हस्तक्षेप केल्यास लिंग असंतुलनासह अनेक समस्या उद्भवू शकतात, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये पशूसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने कृत्रिम रेतनासाठी 20 हजार जनावरांचे लसीकरण केले. यापैकी 14 हजार जनावरांना गर्भाधारणा झाली. दोन महिन्यात जनावरे व्याल्यानंतर लिंग निदान स्पष्ट होणार आहे. 2015-16 मध्ये या विभागाने प्रायोगिक तत्त्वावर वीर्याच्या 9 हजार लसी दिल्या होत्या. याचा परिणाम 30 टक्के झाला होता. धारवाडमधील समशी गावातील शेतकरी शरणू सन्नाक्की म्हणाले, शेतीचे यांत्रिकीकरण झाल्यानंतर बैल हे ओझे झाले आहे. एक गाय तिच्या आयुष्यात तीन ते चार वेळा वासरे पैदा करते. जर गायीला दोन नर वासरे असतील तर नुकसान होते. कारण ते वासरू पाळले आणि तो मोठ होऊन बैल झाला तरी आम्हाला उपयोग नाही, शिवाय कसायालाही विकू शकत नाही.

प्रादेशिक संशोधन अधिकारी डॉ. गणेश हेगडे म्हणाले, पशूरोग निदान प्रयोगशाळेत शेतकरी चांगल्या उत्पन्नासाठी मादी वासरांचा शोध घेत आहेत. देशात दोन बहुराष्ट्रीय कंपन्या जनावरांचे वीर्य पुरवत आहेत. प्रत्येक लसीची किंमत 675 रुपये ते एक हजार रुपये आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार 100 रुपये अनुदान देत आहे. होल्स्टीन फ्रिजियन किंवा जर्सी गायींचे लिंगनिदान केलेले वीर्य आता उपलब्ध आहे.

बंगळूर येथील सेंट्रल फ्रोझन सीमेन प्रॉडक्शन अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (सीएफएसपीटीआय) ही भारतातील 12 केंद्रीय संस्थांपैकी एक आहे, जी बैलाच्या वीर्यावर संशोधन करते. त्यातू गायच जन्माला यावी, अशी व्यवस्था करता येते.

Back to top button