इंग्लिश कोंबडी देते महिना 90 कोटी | पुढारी

इंग्लिश कोंबडी देते महिना 90 कोटी

बेळगाव; संदीप तारिहाळकर :  बदलत्या काळानुसार चिकनला मागणी वाढत असल्याने ब्रॉयलर कोंबड्यांचे उत्पादनही वाढत आहे. ब्रॉयलर कोंबड्याचे उत्पादन घेणारा बेळगाव हा एक प्रमुख जिल्हा म्हणून नावारूपाला येत आहे. आजच्या घडीला जिल्ह्यातील कंपन्या व पोल्ट्रीचालक मुंबई हैदराबाद, गोव्यासह सीमाभागात रोज 1 लाख 50 हजार ब्रॉयलर कोंबड्यांचा पुरवठा करत आहेत. यातून महिनाकाठी 90 कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. 2001 नंतर हा व्यवसाय वाढत गेला. यातून बेळगाव जिल्ह्यात हजारो जणांना रोजगार मिळत आहे. गावोगावी पोल्ट्री फार्म उभे राहत आहेत.

कॉर्पोरेट कंपन्यांना रोज 30 हजार ब्रॉयलर कोंबड्यांचा पुरवठा

बेळगाव जिल्ह्यामध्ये रोज 1 लाख 50 हजार ब्रॉयलर कोंबड्या तयार होऊन बाजारपेठेत जातात. यापैकी 30 हजारहून अधिक ब्रॉयलर कोंबड्या रोज बेळगाव जिल्ह्यातील कॉर्पोरेट कंपन्या कटिंग व पॅकिंग करून विक्री करतात. तर उर्वरित 20 हजार हून अधिक कोंबड्या रोज गोव्याला पुरवठा होतात. याशिवाय शिल्लक कोंबड्या या जिल्ह्यातील किरकोळ दुकानातून तसेच शेजारच्या जिल्ह्यात विक्रीला पाठवल्या जातात. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

जिल्ह्यात 5 हजार जणांना रोजगार

एका पोल्ट्रीला किमान पाच जणांचे मनुष्यबळ लागते. यामुळे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील मिळून अंदाजे एक हजार हून अधिक पोल्ट्री फार्मची संख्या असून 5000 हून अधिक रोजगार निर्मिती पोल्ट्री व्यवसायात प्रत्यक्षपणे होत आहे. तसेच अप्रत्यक्षपणे अनेकांना यातून काम मिळत आहे. दिवसेंदिवस हा व्यवसाय वाढत चालला असून यातून तरुणांना मोठ्या संख्येने काम मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये हा एक आता प्रमुख व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे.

 

अशी आहे जिल्ह्यातील पोल्ट्री फार्मची संख्या

बेळगाव- 300
खानापूर- 300
संकेश्वर-हुक्केरी- 300
कित्तूर- 125
बैलहोंगल- 125
सौंदत्ती- 100
निपाणी- 150
चिकोडी-100
रायबाग- 100
रामदुर्ग- 100

गोव्याला रोज 20 हजार ब्रॉयलर कोंबड्यांचा पुरवठा

पोल्ट्री व्यवसायालाही गोवेकरांचा मोठा फायदा होत आहे. बेळगाव जिल्ह्यातून गोवामध्ये रोज 20 हजारहून अधिक कोंबड्या विक्रीसाठी जातात. काही उत्सवादरम्यान गोव्याला चिकनची मोठ्या प्रमाणात विक्री होते. यातून मोठे अर्थकरण चालत असून जिल्ह्यापेक्षा गोवा येथे अधिक दर मिळत असल्याने पोल्ट्रीचालक, कंपन्यानाही याचा मोठा फायदा होतो. तसेच बेळगाव येथून गोव्याला कोंबड्या वाहतूक करणार्‍या अनेकांना चालक व वाहकांना रोजगार उपलब्ध होत आहे.

जिल्ह्यात 5 पोल्ट्री फार्म वातानुकूलित

अलीकडील काही वर्षांपासून बेळगावसह कोकणातील तापमान वाढत चालले आहे. याचा फटका ब्रॉयलर कोंबड्यांना बसत आहे. ज्यादा तापमानात कोंबड्या मृत होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे आता नव्याने होणारे पोल्ट्रीफार्म वातानुकूलित करण्यात येत आहेत. बेळगाव जिल्ह्यात वातानुकूलित पोल्ट्री फार्मची संख्या पाच आहे. भविष्यात या वातानुकूलित पोल्ट्री फार्मची संख्या वाढेल, असे पोल्ट्री व्यवसाय अभ्यासकांचे मत आहे.

देशात अजूनही प्रति माणसी वर्षाकाठी 11 किलो 500 ग्रॅम चिकनची उपलब्धता पाहिजे. मात्र सध्या 4 ते 4.500 किलो इतकीच आहे. यामुळे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मते अजूनही पोल्ट्री व्यवसाय वाढवणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून शासन ही प्रयत्नशील आहे. पोल्ट्री व्यवसायाबाबत आवश्यक ते सहकार्य नेहमी राज्याच्या पशुपालन व पशुवैद्यकीय विभागामार्फत केले जात आहे. या व्यवसायामधून हजारो जणांना रोजगार मिळत आहे.
– डॉ. आनंद पाटील,
असिस्टंट डायरेक्टर, बेळगाव तालुका हॉस्पिटल,
पशुपालन व पशुवैद्यकीय सेवा खाते

Back to top button