बेळगाव : खबर्‍याला बक्षिसी आली अंगाशी; दोघा पोलिस निरीक्षकांसह पाच जण निलंबित | पुढारी

बेळगाव : खबर्‍याला बक्षिसी आली अंगाशी; दोघा पोलिस निरीक्षकांसह पाच जण निलंबित

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या मोठ्या वाहनाची माहिती देणार्‍या खबर्‍याला अबकारी खात्यातील अधिकार्‍यांनीच परस्पर 301 बॉक्स मद्य देऊन टाकले. परंतु, हा प्रकार अबकारी कायद्यात बसत नसल्याने अबकारीचे उपायुक्त वनजाक्षी यांनी पाच जणांना निलंबित केले आहे. यामध्ये दोघे अबकारी खात्याचे पोलिस निरीक्षक, दोघे उपनिरीक्षक व एका पोलिसाचा समावेश आहे.

निरीक्षक दावलसाब सिंदोगी, सदाशिव कोर्ती, उपनिरीक्षक पुष्पा गडादी यांच्यासह अन्य दोघांचा समावेश आहे. अधिक माहिती अशी ः दहा दिवसांपूर्वी खानापूर तालुक्यातील मोदेकोप्प येथे गोव्याहून मद्य आणणारे वाहन पकडून तब्बल 753 बॉक्स मद्य जप्त केले. हे मद्य 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे असल्याने या छाप्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांनीही कौतुक केले होते.

खबर्‍यासोबत डील

परंतु, हे मद्य पकडण्यापूर्वीच मद्याची माहिती देणार्‍या खबर्‍यासोबत उपरोक्त अधिकार्‍यांनी संगनमत केले होते. पकडलेल्या दारूपैकी 300 बॉक्स तुला देतो पण, आम्हाला खात्रीशीर माहिती दे. त्यानुसार त्याने खात्रीशीर माहिती दिली होती. तेव्हा पोलिसांनी वरिष्ठांना काहीच न सांगता 753 बॉक्सपैकी फक्त 452 बॉक्स पकडल्याचे दाखवले व उर्वरित 301 बॉक्स परस्पर त्या खबर्‍याला देऊन टाकले.

पाचजण निलंबित

खबर्‍याला परस्पर मद्य दिल्याचे पहिल्यांदा चार दिवसांपूर्वी समोर आले. उपायुक्त वनजाक्षी यांनी याबाबतचा अहवाल अबकारीच्या जिल्हा प्रमुखांकडून मागवला. अबकारी जिल्हा प्रमुख विजय हिरेमठ यांनी याचा सविस्तर अहवाल अबकारी उपायुक्तांना पाठवला. त्यानंतर उपायुक्तांनी पाच जणांना निलंबित केले आहे.

अबकारी खात्याला माहिती देणारे अनेक खबरे असतात. अनेकदा छापा यशस्वी झाल्यानंतर स्वखुशीने व सरकारच्या वतीनेही खबर्‍यांना रोख बक्षीस दिले जाते. परंतु, पकडलेलेच मद्य द्यायचे हे कायद्यात बसत नाही. तसा अहवाल वरिष्ठांना दिल्यानंतर त्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
-विजय हिरेमठ, अबकारी जिल्हा प्रमुख

Back to top button