निपाणी : पोलिसांच्या वेशात वृद्ध महिलेची लुटमार; दोन लाखांचे लुटले | पुढारी

निपाणी : पोलिसांच्या वेशात वृद्ध महिलेची लुटमार; दोन लाखांचे लुटले

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : कुन्नूर (ता. निपाणी) येथे भरदिवसा ६० वर्षीय वृद्धेला पोलीस असल्याचे सांगून तिच्याजवळ असलेले सुमारे २ लाख रुपये किंमतीचे दागिने लुटल्याची घटना शनिवारी (दि. ४) सायंकाळी घडली. या घटनेची नोंद रविवारी (दि. ५) सायंकाळी ग्रामीण पोलिसात झाली आहे. लुटमार झालेल्या वृद्धेचे नाव सुभद्रा सदाशिव देसाई (वय ६० रा. बारवाड) असे आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सुभद्रा देसाई व त्यांच्या शेजारी राहत असलेल्या शकुंतला देसाई या दोघीजण नेहमीप्रमाणे बारवाड येथून कुन्नूर येथील संगमेश्वर देवस्थानपर्यंत दररोज सायंकाळी फिरण्यासाठी येत असतात. शनिवारी सायंकाळी सुभद्रा व शकुंतला या दोघीजणी फिरण्यासाठी आल्या असता परत गावाकडे परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी सदर दोघीनाही आपण पोलीस आहोत, पुढे बंदोबस्त आहे. त्यामुळे अज्ञात दोघांनी तुमच्याजवळ असलेले दागिने आमच्याजवळ काढून द्या, अन्यथा तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल,असे सांगितले. भांबावलेल्या सुभद्रा यांनी आपल्या हातातील व गळ्यातील सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चेन, लॉकेट, बिलवर,रिंग असे काढून दिले. यावेळी दुचाकीवरील दुसऱ्याने शकुंतला यांना बोलण्यात गुंतवले. दरम्यान काही वेळानंतर चोरट्यानी बनावट असलेले बिलवर जोड देऊन पोबारा केला. काही वेळानंतर ही घटना लक्षात आल्याने दोघींनीही आरडा ओरड केली. मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. याबाबत सुभद्रा यांनी ग्रामीण पोलिसात रविवारी सायंकाळी अज्ञाताविरोधात फिर्याद दिली असून घटनास्थळी सीपीआय एस.सी.पाटील व उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांनी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या घटनेचा पुढील तपास चालवला आहे.

निपाणी व परिसरात अशा प्रकारच्या घटना नवीन नाहीत. सुरुवातीला अशा घटना उघडकीस आल्यानंतर निपाणी पोलिसांनी जनजागृती म्हणून वृत्तपत्रातून बातम्या, सोशल मीडिया तसेच डिजिटल फलक, ग्रामसभा घेऊन तसेच स्पीकरद्वारे माहिती देऊन अशा प्रकारच्या दागिने लुटीबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन सातत्याने चालवले आहे.असे असताना मात्र आजही अनेक नागरिक व महिला अशा अज्ञातांना फसले जात आहेत.त्यामुळे पोलीस प्रशासनाने अजून काय करायचे असा प्रश्न पडला आहे. दरम्यान अशा अज्ञात व्यक्तींपासून वेळीच नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन निपाणी पोलीस प्रशासनाने केले आहे.

Back to top button