बेळगाव : म्हादईचे पाणी न वळवल्यास नाव बदलेन – गोविंद कारजोळ | पुढारी

बेळगाव : म्हादईचे पाणी न वळवल्यास नाव बदलेन - गोविंद कारजोळ

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  येत्या वर्षभरात कळसा – भांडुरा पाणी योजना पूर्ण करून म्हादईचे पाणी कर्नाटकाकडे वळवू, अन्यथा मी माझे नाव बदलेन, अशी दर्पोक्ती कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केली आहे. गोवा सरकारने म्हादईचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे नेण्याचा निर्णय घेतलेला असतानाच, कर्नाटकाच्या मंत्र्यांनी असे विधान केल्याने आता गोवा भाजप विरुद्ध कर्नाटक भाजप असा संघर्ष होणार का, असा प्रश्न आहे.

सोमवारी राज्यभरात भाजपने विजय बूथ अभियान राबवले. त्या अभियानाचे उद्घाटन करुन पत्रकारांशी बोलताना मंत्री कारजोळ म्हणाले, कळसा-भांडुरा नाला जोड प्रकल्प आणि म्हादईचे पाणी वळवण्यासाठी येत्या महिनाभरात निविदा मागवू. येत्या वर्षभरात ही योजना पूर्ण करू. अन्यथा मी माझे नाव गोविंद कारजोळ असे सांगणार नाही. काँग्रेस या योजनेविरुद्ध शंका उपस्थित करत आहे. या योजनेला केंद्रीय जल आयोगाची परवानगीच मिळालेली नाही असे त्यांचे म्हणणे आहे. मंजुरीपत्रावर तारीख नाही, शिक्का नाही, असा दावा ते करतात. पण आयोगाने मंजुरी दिलेली आहे. हे वास्तव काँग्रेसला नाकारता येणार नाही.

टीका करताना मंत्री पुढे म्हणाले, काँग्रेसने या योजनेसाठी काहीच केले नाही. उलट पाण्यासाठी मोर्चा काढणाऱ्या महिलांवर लाठीमार केला. म्हादई योजनेसाठी चाललेले आंदोलन हास्यास्पद आहे, अशी टीकाही काँग्रेसने केली होती.

म्हादई योजना पूर्ण करू : काँग्रेस

काँग्रेसनेही सत्तेवर येताच म्हादई योजना पूर्ण करू, अशी घोषणा केली आहे. हुबळीत काँग्रेसच्या राज्यभर बस यात्रेची घोषणा करताना राज्य प्रभारी रणजितसिंह सूरजेवाला म्हणाले, येत्या निवडणुकीनंतर कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर येईल. सत्तेवर येताच सहा महिन्यांत आम्ही म्हादई योजना पूर्ण करू. त्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद तातडीने करू. शिवाय म्हादईवरील एकूण प्रकल्पांसाठी ३ हजार कोटींची तरतुद करू.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. म्हादई नदीचे पाणी वळवून ते मलप्रभा नदीत सोडायचे आणि हुबळी, धारवाड, नरगुंद, नवलगुंद आदी भागाला पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यायचे, अशी ही योजना आहे.

Back to top button