सीमावासीयांचा आज एल्गार; महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी | पुढारी

सीमावासीयांचा आज एल्गार; महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक सरकारने येथे आयोजित केलेल्या विधिमंडळ अधिवेशनाविरोधात सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे. व्हॅक्सिन डेपो मैदानावर सकाळी 11 पासून हा महामेळावा होणार आहे. सीमाप्रश्नावरील तज्ज्ञांच्या समितीचे अध्यक्ष खा. धैर्यशील माने यांच्यासह महाराष्ट्रातील नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सीमाबांधवांनी या महामेळाव्यात सहभागी होऊन आपली अस्मिता दर्शवावी, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.

बेळगावसह मराठीबहुल भाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्याने लढा देत आहे. 2004 साली हा वाद सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर बेळगाव आपल्या हातातून निसटू नये, यासाठी कर्नाटकने बेळगावात सुरुवातीला खासगी जागेत तर त्यानंतर हलगा येथे सुवर्णसौध उभारून विधिमंडळ अधिवेशन भरवले.

सोमवार, दि. 19 पासून कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. पण, दरवेळेप्रमाणे यावेळीही कर्नाटकच्या या अधिवेशनाला कडाडून विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने कंबर कसली आहे. महामेळावा यशस्वी करावा, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, अ‍ॅड. एम. जी. पाटील, शिवाजी सुंठकर, सरस्वती पाटील आदींनी केले आहे. दरम्यान, पोलिसांनी महामेळावा स्थळाची पाहणी करून आढावा घेतला. चोख पोलिस बंदोबस्त राखण्यात आला आहे.

Back to top button