दिवाळी पाडव्याला रंगणार म्हशींचा सन्मान सोहळा | पुढारी

दिवाळी पाडव्याला रंगणार म्हशींचा सन्मान सोहळा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा :  दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा सर्वत्र दिवाळी उत्साहात सुरु आहे. त्यातच उद्या बुधवारी दिवाळी पाडव्यानिमित्त शहरात गवळी बांधवांकडून होणार्‍या म्हशींच्या सन्मान सोहळ्याचीही जय्यत तयारी सुरु आहे.

ओरिएंटल स्कूलजवळ हलगीच्या तालावर शहापुरातील म्हशींच्या मिरवणुकीला सुरुवात होते. तर शहरात कोनवाळ गल्ली, चव्हाट गल्ली, कंग्राळ गल्ली, आनंदवाडी शहापूर, हट्टीहोळ गल्ली, शहापूर, मिरापूर गल्ली, रयत गल्ली, वडगाव, कॅम्प गवळी गल्ली, अनगोळ या ठिकाणी म्हशींचा सन्मान केला जातो.

बुधवार दि. 26 रोजी दिवाळी पाडव्यादिवशी ओरिएंटल स्कूलजवळ शहरातील हौशी म्हशी पालक एकत्र आल्यानंतर दुपारी मिरवणूक प्रारंभ होणार आहे. कोल्हापूर येथील हलगीपथक सहभागी होणार आहे. यानंतर हट्टीहोळ गल्ली ते मिरापूर गल्ली, कचेरी गल्ली, कोरे गल्लीतून पुढे आनंदवाडी येथे जातात. यानंतर पंडित नेहरु हायस्कूलजवळ सर्व म्हशींचे पूजन झाल्यानंतर
मिरवणुकीची सांगता होते.

शेकडो वर्षांची परंपरा

गवळी ज्या ग्राहकांना दूध विकतात, अशा ग्राहकांच्या दारात दिवाळी पाडव्याला गवळी म्हशी घेऊन जातात अन् त्यांना नमस्कार करतात. ग्राहक काही भेटवस्तू गवळी बांधवांना देतात. ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. दुचाकीबरोबर म्हशी पळविण्याची शर्यतही होते.

बेळगावात म्हशींच्या सन्मान सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. गत दोन वर्षे हा उत्सव झाला नव्हता, पण यंदा हा सन्मान सोहळा अधिक उत्साहात होणार आहे. आम्ही दरवर्षी या सोहळ्यात भाग घेऊन पशूपालकांना भेटवस्तू देऊन गौरव करतो.
-वैभव खाडे, बेळगाव

Back to top button