निपाणी बाजारपेठेत सात कोटींची उलाढाल | पुढारी

निपाणी बाजारपेठेत सात कोटींची उलाढाल

निपाणी : पुढारी वृत्तसेवा :  दिवाळीनिमित्त गेल्या आठवड्यापासून बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. यामुळे व्यापार्‍यांच्या चेहर्‍यावर हसू दिसत आहे. सोमवारी लक्ष्मीपूजनादिवशी खरेदीला उधाण आले होते. सुमारे पाच ते सात कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सायंकाळी घरोघरी लक्ष्मीपूजन उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरे करण्यात आले.

यामध्ये सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, कपडे आदींबरोबर दिवाळीच्या मुहूर्तावर निपाणीमध्ये स्थावर मालमत्तांचे व्यवहार मोठ्या
प्रमाणात झाले. गेल्या दोन वर्षांनंतर कोरोनामुळे मंदीच्या काळातही गेल्या़ दोन-तीन दिवसांमध्ये कोट्यवधींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापारी वर्गाकडून व्यक्त केला जात असून, यंदा खंडग्रास सूर्यग्रहणामुळे बुधवारी पाडवा व भाऊबीज एकाचदिवशी असल्याने मोठ्या उलाढालीची अपेक्षा व्यापारी वर्गाला आहे.

गेल्या वर्षभरात ऊस, सोयाबीन व इतर शेतमालाला चांगला दर मिळाल्याने यावर्षी आर्थिक मंदी काहीशी दूर झाली आहे. तर पावसामुळे खरीप चांगला साधला होता. मात्र, परतीच्या पावसामुळे काही प्रमाणात शेतकर्‍यांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे या सण उत्सवाला मर्यादा आल्या होत्या, मात्र दोन वर्षानंतर हा सण साजरा करण्यासाठी लोक सज्ज झाले आहेत.

विविध वस्तूंच्या खरेदीसाठी सारे कुटुंबच बाहेर पडल्याचे दिसून येत आहे. तयार कपडे, साड्या, ड्रेस मटेरियल, मोबाईल, टीव्ही, रेफ्रिजरेटर आदी गृहोपयोगी वस्तू, सुका मेवा, मिठाई दुकानातून ग्राहकांची गर्दी दिसून आली. सोन्याच्या दरामध्ये काहीशी वाढ झाली असली तरी सोने खरेदीशिवाय दिवाळी नाही, असे समीकरण झाल्याने अनेकांनी सोन्याची खरेदी केली.

शहरांमधील सर्व सराफपेढ्या रात्री उशिरापर्यंत गजबजून गेल्या होत्या. दरम्यान, सोमवारी लक्ष्मीपूजनासाठी लागणारी फळे, फुले, पूजेचे साहित्य, फटाके, ऊस रोप खरेदीसाठी बाजारपेठेसह म्युनिसिपल हायस्कूल पटांगण, केएई कॉलेज, अकोळ क्रॉस येथे गर्दी झाली
होती. केळी रोप जोडीस 50 ते 200 तर पाच उसांचा दर 50 ते 80 रुपये तर फुलाचा भाव 80 ते 150 रुपये किलो होता. सायंकाळपर्यंत या व्यवहारात सुमारे पाच ते सात कोटींची उलाढाल झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

पाडव्यासाठी जय्यत तयारी

बुधवारी होणार्‍या पाडव्याच्या पोर्शभूमीवर दुकाने सज्ज झाली आहेत. दोन-तीन आठवड्यांपासून दुचाकी वाहने, ट्रॅक्टर यांचे बुकिंगही जोरदार सुरू आहे. मोबाईल, टीव्ही, फ्रीजसह विविध गृहोपयोगी उपकरणांसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही मागणी वाढली आहे. सोने खरेदीसाठीही यंदाची दिवाळी मोठी ठरली आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे वर्षात मागणी असूनही दुचाकी ग्राहकांना मिळू शकल्या नाहीत. कोरोनामुळे सर्व क्षेत्रावर परिणाम झाला होता. याची दक्षता घेऊन अनेकांनी महिनाभर अगोदर दुचाकीसाठी बुकिंग केले होते. नवनवीन मॉडेलच्या दुचाकी मोठ्या प्रमाणात खरेदी होताना सध्या दिसून येत आहेत. विशेष करून पाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी इमारती, प्लॉट आदी स्थावर मालमत्तांचे व्यवहार होतील, अशी अपेक्षा आहे.

Back to top button