बेळगाव : निलजीत लम्पीने आठ जनावरांचा बळी | पुढारी

बेळगाव : निलजीत लम्पीने आठ जनावरांचा बळी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा लम्पी स्किन आजाराचा बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. निलजी गावातील 8 जनावरे दगावली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने म्हैस, गाय, बैल आदी जनावरांचा समावेश आहे.

लम्पीचा फटका दूध व्यवसायाला झाला आहे. पशू वैद्यकीय खात्याच्या दुर्लक्षामुळे रोग झपाट्याने वाढत चालला आहे. गावातील विष्णू गाडेकर, भाऊराव मोदगेकर, आप्पाजी मोदगेकर, प्रताप पाटील, बाळाराम मुकुंद, श्रीगुरु अक्षीमणी, वसंत पाटील, महादेव पाटील या शेतकर्‍यांची किंमती जनावरे दगावल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

गावातील अनेक जनावरे सध्या आजारी असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. गावामध्ये लसीकरण मोहीम सुद्धा राबविण्यात आली आहे. रोग नियंत्रणासाठी शेतकर्‍यांनी गोठ्याची स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना प्रादुर्भावग्रस्त जनावरांपासून वेगळे बांधावे. तसेच गाई व म्हशींना एकत्र ठेवू नये असा सल्ला या भागाचे पशुवैद्यकीय अधिकारी दिलीप शांतीनाईक यांनी दिला आहे. या भागातील बसरीकट्टी, शिंदोळी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री गावातही या रोगाची लागण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

हा आजार केवळ गाई व बैलांना होतजनावरांना होत असून त्याचा मानवी आरोग्याला कोणताही धोका नाही. याबाबत कोणीही अफवा पसरवून लोकांना भयभीत केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

Back to top button