निपाणी : सोयाबीनच्या सुगीला पावसाचा अडसर | पुढारी

निपाणी : सोयाबीनच्या सुगीला पावसाचा अडसर

निपाणी : पुढारी वृत्तसेवा यंदाच्या रब्बी हंगामातील पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या सोयाबीन पिकाच्या कापणीला व मळणीला सुरुवात झाली असून, दिवसाआड पाऊस असल्याने या पावसाचा अडसर सुगीवर झाला आहे. दिवसा उघडीप व रात्री पाऊस असल्याने पीक काढण्यासाठी शेतकरी वर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. सोयाबीन पिकाला सध्या क्विंटलला 5 हजार 300 (10 हवेला) दर असून हा दर अपेक्षित नसल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

दर असमाधानकारक असल्यामुळे शेतकर्‍यांनी सोयाबीन विक्रीपेक्षा साठवणुकीवर भर दिला आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनचे दर 60 रुपयांच्या वर होते. आता पुन्हा घट झाल्याने शेतकर्‍यांची निराशा झाली आहे. साठवलेल्या सोयाबीनची विक्री करावी विचार सुरू असतानाच पुन्हा नव्या सोयाबीनला सुरूवातीच्या हंगामातच उतरती कळा लागली आहे. यात सोयाबीन दरात रात्रीत बदल होत आहेत. येत्या पंधरवड्यात सोयाबीनची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे.

दरात घट होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. सोयाबीन हे परिसरातील शेतकर्‍यांचे मुख्य पीक आहे. गतवर्षी सोयाबीनला सुरुवातीला 80 ते 100 रूपये दर मिळाला होता. मात्र, आता सुरूवातीच्या कमी दराने शेतकर्‍यांना घाम फोडला आहे. दर वाढणार की नाही, याचीच धाकधूक शेतकन्यांना लागली आहे. यावेळी खराब हवामानामुळे गतवेळच्या तुलनेत उत्पादनात घट आहे. अशी परिस्थती असताना दर वाढतील असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गत वेळेप्रमाणे सोयाबीनच्या दरात कायम चढ-उतार राहिलेला आहे.

शेती मशागतीपासून ते पीक काढणीपर्यंतचा खर्च वाढलेला आहे. अशातच अपेक्षित तर नसल्याने शेतकरी वर्गाच्या नाकीनऊ आले असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे निपाणी व परिसरात यंदा शेतकर्‍यांनी विक्रमी 5 हजार हेक्टरवर सोयाबीनचे उत्पादन घेण्यात आले आहे. अद्यापही 70 टक्के क्षेत्रावरील सोयाबीन पिकाची काढणी अपुरी आहे. मात्र, अपेक्षित दर नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे याकडे राज्य सरकारने लक्ष देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सोयाबीनची खरेदी करूनशेतकर्‍यांना आर्थिक दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.

रात्रीत 20 मि.मी. पाऊस सुगी तोंडावर आली आहे. त्यामुळे पावसाची गरज नाही. अशा परिस्थितीत दिवसाआड रात्री विजांच्या कडकडाट वादळी वार्‍यासह पाऊस होत आहे. हा पाऊस सुगीला मारक ठरत आहे. मंगळवारी मध्यरात्री निपाणी परिसराला या पावसाने झोडपून काढले. या पावसाची बुधवारी सकाळी 20 मिमी नोंद येथील कृषी संशोधन केंद्रातील पर्जन्यमापकावर झाली आहे.

Back to top button