मंत्री उमेश कत्ती यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार | पुढारी

मंत्री उमेश कत्ती यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले वन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाचे मंत्री उमेश कत्ती (वय ६१) यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंगळूरहून विशेष विमानाने दुपारी बेळगाव येथील सांबर विमानतळावर आगमन झाल्यानंतर पार्थिव हुक्केरी तालुक्यातील बेल्लद बागेवाडी येथे नेण्यात आले. सार्वजनिक दर्शनानंतर वीरशैव लिंगायत परंपरेनुसार बुधवारी (७ सप्टें) रात्री त्यांच्या मळ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंत्री उमेश कट्टी यांच्यावर त्यांचे वडील विश्वनाथ कत्ती आणि आई राजेश्वरी कत्ती यांच्या समाधीस्थळा शेजारीच अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी विश्वराज साखर कारखान्याच्या आवारात पार्थिवाच्या सार्वजनिक दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते उमेश कत्ती यांच्या पत्नी शीला यांना राष्ट्रध्वज देण्यात आला. हवेत तीन राऊंड गोळीबार करून शासकीय मानवंदना देण्यात आली. त्यानंतर विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा, केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे, महसूलमंत्री आर.अशोक, पालकमंत्री गोविंदा करजोळ, गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र, मंत्री सी.सी.पाटील, हलप्पा आचार, डॉ. शंकर पाटील मुनेनाकोप्पा, भाजप प्रदेशाध्यक्षा नलीना कुमार कटील, राष्ट्रीय सचिव सी. टी रवी, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, एच. डी रेवन्ना, बी.एस.विजयेंद्र, खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्या इरण्णा काडाडी, आमदार रमेश जारकीहोळी, बसना गौडा पाटील, सतीश जारकीहोळी आदी उपस्थित होते.

हुक्केरीचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, निदासोसी मठाचे शिवलिंगेश्वर श्री, कुडलसंगमा पंचमसाली पीठाचे जगद्गुरू जयमृत्युंजय स्वामीजी आणि विविध धर्मगुरू उपस्थित होते. अंतिम यात्रा विश्वराज साखर कारखाना प्रांगणातून सुरू होऊन बागेवाडी गावातून रात्री ९.३० वाजता मळ्यात पोहोचली. धार्मिक विधीनंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेसह हजारो लोकांनी दिवंगत नेत्याचे अखेरचे दर्शन घेतले. १४ मार्च १९६१ रोजी जन्मलेले मंत्री कत्ती यांनी वडील विश्वनाथ कत्ती यांच्या अकाली निधनानंतर वयाच्या २५ व्या वर्षी विधानसभेत प्रवेश केला. ते आठ वेळा आमदार म्हणून निवडून आले.

हेही वाचलंत का?

Back to top button