बेळगाव: दीड लाखांसाठी मित्राचा खून; त्याच्याच दुचाकीवर बसून केले कोयत्याने वार | पुढारी

बेळगाव: दीड लाखांसाठी मित्राचा खून; त्याच्याच दुचाकीवर बसून केले कोयत्याने वार

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा: धावत्या दुचाकीवर मागे बसलेल्या मित्राने धारदार कोयत्याने मानेवर सपासप वार करत मित्राचा निर्घृण खून केला. गदगय्या व्ही. हिरेमठ (वय 40, रा. शिंदोळी, ता. बेळगाव) असे मृताचे नाव आहे. हलगा येथील जैन बस्तीजवळ सायंकाळी 5 च्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. गदगय्याने उसने घेतलेले दीड लाख रुपये देण्यास टाळाटाळ चालवल्याने हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकरणाचा रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी गदगय्या हिरेमठ व संशयित खुनी यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला होता. संशयित खुनी हा कोंडसकोप्पचा असून त्याने गदगय्याला दोन लाखाची रक्कम हातउसनी दिली होती. ही रक्कम देताना त्याने घरी आई-वडील व भावाला काहीच सांगितले नव्हते. महिनाभरात रक्कम परत देतो, असे सांगून गदगय्याने दोन लाख घेतले होते. मात्र 50 हजाराची रक्कम परत दिल्यानंतर उर्वरित दीड लाखाची रक्कम तो आज-उद्या असे म्हणत वेळकाढूपणा करत होता.

रक्कम थकवल्याने राग

शुक्रवारी सायंकाळी दोघेजण शिंदोळीहून तारीहाळकडे दुचाकीवरून जात होते. गदगय्या हा दुचाकी चालवत होता, तर त्याचा मित्र व संशयित खुनी मागे बसला होता. त्याने गदगय्याला पुन्हा पैशाबाबत विचारणा केली. ‘दोन लाख कुठे आहेत? असे घरचे सातत्याने विचारत आहेत. त्यांना खोटे सांगून मी थकलो आहे. त्यामुळे माझे पैसे लवकर परत दे’, असे सांगत होता. परंतु, त्याला गांभीर्याने न घेता गदगय्या हा त्याची चेष्टा करत ‘देतो रे, जरा थांब माझं काम होऊ दे’, असेच सांगत होता. याचा राग संशयिताला आला.

शिवाय आज रक्कम नाही दिली तर काटा काढायचा, या उद्देशानेच तो तयारीने आला होता. त्याच्याकडे असलेल्या पिशवीतच कोयता होता. गदगय्याला रक्कमेबाबत विचारूनही त्याने ही बाब पुन्हा हसण्यावारी नेल्याने पाठीमागे बसलेल्या संशयिताने धावत्या दुचाकीवरच (केए-22 ईटी-5565) त्याच्या मानेवर सपासप वार करत मान चिरली. ही जखम त्याच्या श्वसननलिकेपर्यंत गेल्याने गदगय्या धावत्या दुचाकीवरून रस्त्याकडेला कलंडला. रक्ताच्या चिळकांड्या उडत असलेले हे दृष्य पाहून आजूबाजूचे लोक घाबरले. काहींनी पाठीमागे बसलेला संशयित पळून जातानाही पाहिले. परंतु, त्याला अडवण्याचे धाडस कोणीही केले नाही.

पोलिस आयुक्तांची भेट

घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रविंद्र गडादी, बेळगाव ग्रामीणचे एसीपी एस. व्ही. गिरीश, हिरेबागेवाडीचे निरीक्षक विजयकुमार सिन्नूर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. दुचाकीवरच पडलेला मृतदेह त्यांनी उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयाकडे पाठवला. नेमका खून कोणी केला आहे, याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. परंतु, त्याला अद्याप ताब्यात न घेतल्याने संबंधिताचे नाव समजू शकले नाही.

बकरी विकून दिली होती रक्कम

संशयित खुनी कोंडसकोप्प येथील असून तो मेंढपाळ आहे. त्याने आपल्याकडील बकरी विकून गदगय्याला दोन लाखांची रक्कम दिली होती. बकरी कमी दिसल्या तेव्हा संशयिताला घरच्यांनी बकरी कमी का? अशी विचारणा केली. यावेळी त्याने विकल्याचे सांगितले. मग विकला असशील तर पैसे कुठे आहेत? असे विचारत होते. यावेळी तो काहीच सांगत नव्हता. पैशाचे काय केलास याची सातत्याने विचारणा आणि गदगय्याकडून रक्कम देण्यास होणारी टाळाटाळ यामुळे वैतागलेल्या संशयिताने गदगय्याचा खून केल्याची चर्चा घटनास्थळी होती. परंतु, पोलिसांनी याला अधिकृत दुजोरा दिला नाही.

 

Back to top button