बेळगाव : खानापूर-हेम्माडगा मार्गावरील वाहतूक बंद | पुढारी

बेळगाव : खानापूर-हेम्माडगा मार्गावरील वाहतूक बंद

खानापूर; पुढारी वृत्तसेवा :  संततधार पावसामुळे खानापूर-हेम्माडगा मार्गावरील हालात्री नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने गुरुवारी सकाळपासून वाहतूक ठप्प झाली आहे. पश्चिम भागासह म्हादई नदीच्या खोर्‍यात पावसाचा जोर कायम असल्याने नदी नाल्यांची पातळी धोक्याच्या दिशेने सरकत आहे.

खानापूर शहर आणि मध्यवर्ती भागात पावसाचा जोर किंचितसा कमी झाला असला, तरी पश्चिम भागात धुवाधार कायम आहे. बुधवारी रात्रभर पावसाची संततधार सुरूच होती. त्याचा परिणाम म्हणून सकाळी आठच्या सुमारास हालात्री नदीचा पूल पाण्याखाली गेला. वाहतुकीला असलेला धोका ओळखून पोलिसांनी बॅरिकेड्स लावून हा रस्ता बंद केला आहे. त्यामुळे हेमाडगा, शिरोली, नेरसा परिसरातील 25 गावांचा संपर्क तुटला आहे. या मार्गावरील बस वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थी व प्रवाशांना समस्येचा सामना करावा लागला.

तिओली पूल पाण्याखाली
तिओली मार्गावरील पूल देखील पाण्याखाली गेल्याने तिओली गावचा शहराशी संपर्क तुटला आहे. शाळेला गेलेल्या विद्यार्थ्यांना सायंकाळी पालकांनी सुरक्षित रित्या पूल ओलांडून घरी नेताना मोठी कसरत करावी लागली.

Back to top button