बेळगाव : ‘कृष्णा’ तुडुंब; मात्र चिकोडीत पाणीटंचाई | पुढारी

बेळगाव : ‘कृष्णा’ तुडुंब; मात्र चिकोडीत पाणीटंचाई

चिकोडी; पुढारी वृत्तसेवा :  नद्या तुडुंब भरल्या असताना ऐन पावसाळ्यात चिकोडी शहरात मात्र गेल्या काही दिवसांपासून नळाला पाणीचे आले नाही. त्यामुळे चिकोडी शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

जिल्हास्तरीय शहर असलेल्या चिकोडीची सुमारे 50 हजार लोकसंख्या आहे. शहरात सर्व जिल्हास्तरीय सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. भुयारी गटार, उत्कृष्ट रस्ते, 24 तास पाणी पुरवठाासह अनेक सुविधा राबविण्यात आल्या आहेत.
चिकोडी शहरात पूर्वी पाण्याची समस्या गंभीर होती. नळाला नियमित पाणी पाणी येत नव्हते. पण काही दिवसांपूर्वी शहरात भुयारी गटार योजना (यूजीडी) व 24 तास पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली.

शहरात कोट्यवधी रुपये खर्चून 24 तास पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली आहे. या योजनेद्वारे कल्लोळ येथून पाईपलाइनने पाणी आणून केरुर क्रॉस येथे शुद्धीकरण करून चिकोडी शहरातील चार ठिकाणी असलेल्या ओव्हरहेड टँकमध्ये पाणी साठविण्यात येते. तेथून स्वतंत्रपणे त्या-त्या भागात पाणीपुरवठा करण्यात येतो. पण, मागील दहा दिवसांपासून काही तांत्रिक कारण व नियोजनाचा अभाव यामुळे बहुतांश भागात नळाला पाणीच आले नाही. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. 24 तास नको एक तास तरी पाणी द्या, अशी मागणी नागरिक करत आहेत.

उन्हाळ्यात नदी कोरडी पडली असेल तर पाणी पुरवठ्यात व्यत्यय येऊन शकतो. पण, कृष्णा नदी तुडूंब भरून वाहत आहे. तरीदेखील शहरातील नागरिकांना पाणी मिळेना हे दुर्दैव म्हणावे लागेल. ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.
कोट्यवधी रुपये खर्चून राबविण्यात आलेली 24 तास पाणी पुरवठा योजना अधिकार्‍यांच्या चुकीमुळे कूचकामी ठरली असल्याचा आरोप नागरिकांतून करण्यात येत आहे. संबंधित अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन समस्या शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.

 

काही ठिकाणी पाईपलाईनला गळती व इतर तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण झाला होता. आता सर्व दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे सुरळीत पाणीपुरवठा होईल.

– सुंदर रुगी, मुख्याधिकारी नगरपरिषद चिकोडी

Back to top button