बेळगाव : जिल्ह्यातील 24 गावांमध्ये ‘हर घर जल’ | पुढारी

बेळगाव : जिल्ह्यातील 24 गावांमध्ये ‘हर घर जल’

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  ग्रामीण भागातील प्रत्येक घरात शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जलजीवन मिशन योजनेतून ‘हर घर जल’ माध्यमातून जिल्ह्यातील 24 गावांना प्रत्येक घरात पाणीपुरवठा करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. 228 गावांमध्ये नळजोडणीचे काम पूर्ण झाले आहे.

केंद्र सरकारने राज्य सरकार आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून प्रत्येक घरांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जलजीवन मिशन योजना हाती घेतली आहे. या माध्यमातून कामे सुरू आहेत. जलवाहिनी घालण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 228 गावांमध्ये 100 टक्के नळजोडणीची कामे पूर्ण झाली आहेत. परंतु संपूर्ण घरांना पाणीपुरवठा झालेल्या गावांना हर घर जल म्हणून घोषित करण्यात येत आहे.

योजना पूर्ण झाल्यानंतर ग्रामसभा घेण्यात येते.त्याठिकाणी गावकर्‍यांनी सर्व घरांना योग्यप्रकारे पाणीपुरवठा होत असल्याची माहिती देणे आवश्यक आहे. तरच हर घर जल प्रमाणपत्र देण्यात येते. अन्यथा ठेकेदाराला पुन्हा दुरुस्ती करण्याचे बजावण्यात येते.
कार्यक्रमाची छायाचित्रे, व्हिडीओ जलजीवन मिशन, आयएमआयएस पोर्टलवर अपलोड करून जिओ टँगिग करणे बंधनकारक आहे. त्यानंतर हर घर जल प्रमाणपत्र देण्यात येते. यामध्ये अडथळा आल्यास तीन महिन्याच्या आत अडथळा दूर करणे आवश्यक आहे.

12 ऑगस्टपर्यंत अभियान
जलजीवन मिशन योजनेतून करण्यात आलेली कामे 12 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावीत. हर घर जल योजनेचे प्रमाणपत्र मिळवावे, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. यामुळे अधिकार्‍यांची धावपळ सुरू झाली आहे.
इंटरनेटची समस्या
योजना पूर्ण झालेली छायाचित्रे, व्हिडीओ ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. परंतु दुर्गम भागात इंटरनेटची समस्या येत आहे. परिणामी ऑफलाईन माहिती जमा करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे.

नळजोडणीत बेळगाव जिल्हा अव्वल
हर घर जल प्रमाणपत्र मिळविलेल्या गावांची संख्या गदग जिल्हा अव्वल आहे. मात्र बेळगाव जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक घरांना नळजोडणी करण्यात आली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील 2 लाख घरांना नळजोडणी करण्यात आली आहे. तर यावर्षी 2.80 घरांना नळजोडणी केली आहे. ही संख्या राज्यात सर्वाधिक असल्याची माहिती जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी दिली आहे.

Back to top button