बेळगाव : जुगार खेळणार्‍या निरीक्षकांसह चौघे निलंबित | पुढारी

बेळगाव : जुगार खेळणार्‍या निरीक्षकांसह चौघे निलंबित

बेळगाव;  पुढारी वृत्तसेवा :  दरवेळी मटका, जुगार्‍यांवर पोलिस छापा टाकतात; परंतु जुगार खेळणार्‍या पोलिसांवरच छापा टाकण्याची घटना दुर्मीळच. हुबळीच्या पोलिस आयुक्‍तांनी जुगार खेळणार्‍या आपल्याच विभागाच्या निरीक्षकांसह पाच जणांवर छापा टाकून अटक केली आहे. एवढ्यावरच न थांबता या सर्वांना शनिवारी निलंबितही केले. या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू आहे.

हुबळी येथील अक्षय कॉलनीतील एका घरात पोलिस निरीक्षक, दोन हेडकॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल व एक निवृत्त हेडकॉन्स्टेबल या पाच जणांनी एक्‍का, राजा-राणीचा डाव मांडल्याची माहिती पोलिस आयुक्‍त लाबुराम यांना मिळाली. इतरवेळी उच्चभ्रू, मध्यमवर्गीय व मजूर गटातील लोक जुगार खेळतात. पोलिस जाऊन त्यांना पकडतात अन् गुन्हा दाखल करतात; परंतु येथे तर चक्‍क पोलिसच जुगार खेळत होते. मग कारवाई कशी करायची? असा विचार न करता आयुक्‍तांनी थेट गोकुळ रोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची
यांना कारवाईचे आदेश दिले. त्यांनी येथे जाऊन छापा टाकला असता पाच जण आढळले. त्यांच्यावर गोकुळरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी रात्री घडलेल्या प्रकरणानंतर शनिवारी या सर्वांची चौकशी झाली. ते दोषी असल्याचे आढल्याने आयुक्तांनी चौघांना निलंबित केले आहे. यामध्ये सीएआरचे हेडकॉन्स्टेबल मुत्ताप्पा कल्लाप्पा कटनायक (वय 46), वाहतूक विभागाचे कॉन्स्टेबल बसवण्णप्पा नागाप्पा भावीहाळ (वय 30), सीएआर चे हेडकॉन्स्टेबल नवीन गुद्देप्पा तोपलकट्टी (वय 30) व शहर राखीव दलाचे पोलिस निरीक्षक संतोष भोजप्पगोळ यांचा समावेश आहे. निवृत्त हेडकॉन्स्टेबल श्रीकांत पुंडलिकप्पा गोंदकर (वय 61) यांच्यावरही गुन्हा दाखल करीत समज देऊन सोडून दिले.

कडक शिस्तीचे पोलिस आयुक्‍त
हुबळी-धारवाडचे पोलिस आयुक्‍त लाबुराम हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. गुन्ह्याचे स्वरूप कोणत्याही प्रकारचे असले तरी तातडीने निपटारा करण्यात त्यांचा हातखंडा आहे. येथे जुगार खेळणारे पोलिस आहेत म्हणून त्यांनी माफी दिली नाही. तर थेट कारवाईचे आदेश दिले. त्यांच्या या आदेशामुळे पोलिस खात्यातही दहशत पसरली आहे.

Back to top button