बेळगाव : प्रवाशांची दैना, खड्ड्यांचा प्रवास सोसवेना! | पुढारी

बेळगाव : प्रवाशांची दैना, खड्ड्यांचा प्रवास सोसवेना!

खानापूर; पुढारी वृत्तसेवा :  बेळगाव-गोवा महामार्गाचे अर्धवट राहिलेले काम आणि खराब रस्त्याच्या दुरुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे खानापूर-रामनगर-अनमोड या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. धोकादायक खड्ड्यांमुळे चार चाकीच नव्हे तर अवजड वाहनांचेही पाटे मोडण्याचे आणि नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत असल्याने वाहन चालक वैतागले आहेत.

गुंजी, लोंढा, रामनगर, अनमोड यादरम्यान महामार्गावर बाजूपट्टीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत 15 ते 20 फूट रुंदीचे खड्डे पडल्याने त्यातून वाहन नेल्याशिवाय पर्याय नाही. खड्ड्यांचा रात्रीच्या वेळी अंदाज येत नसल्याने वाहने कधीही कुठेही बंद पडत आहेत. एकीकडे अपघाताची टांगती तलवार आणि दुसरीकडे वाहन नादुरुस्त होण्याची भीती अशा अडचणीत प्रवास करताना चालक वर्गाला या मार्गावरील प्रवास म्हणजे भयंकर शिक्षा ठरली आहे.

सुदैवाने आठ दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे सध्या जरी येथून वाहतूक सुरू असली तरी पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्यास या रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. जेसीबी लावून खड्ड्यांचे सपाटीकरण करण्याचा प्रकार तात्पुरता आहे. त्यापेक्षा उघडीपीत धोकादायक खड्डे कोरडे पडल्याने तातडीने डांबरीकरण करून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी आहे. गणेशोत्सवापूर्वी तरी खड्डे मुक्त प्रवासाची सोय करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला महामार्ग प्राधिकरणाने कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

साडेचार कोटींच्या दुरुस्तीची मलमपट्टी!
महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागू नये, यासाठी रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी वर्षभरापूर्वी साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून जुना रस्ता उखडून टाकलेल्या ठिकाणी खड्ड्यांची दुरुस्ती आणि पॅचवर्कचे काम करण्यात आले होते. पण दुरुस्ती केलेल्या ठिकाणीही पुन्हा खड्डे पडल्याने साडेचार कोटींची मलमपट्टी थूकपट्टीच ठरली आहे.

Back to top button