बेळगाव : आरसींच्या बदलीमागे राजकीय षडयंत्र | पुढारी

बेळगाव : आरसींच्या बदलीमागे राजकीय षडयंत्र

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  कडक स्वभावाचा अन् सरकारी नियमानुसार वागत आपले न ऐकणारा वरिष्ठ अधिकारी राजकीय नेत्यांना नको असतो. शिवाय काटेकोरपणे काम करवून घेणारा अधिकारी हाताखालील अधिकार्‍यांनाही नको असतो. या दोन कारणांतून बेळगाव विभागाचे प्रादेशिक आयुक्त व बिम्सचे प्रभारी आमलान आदित्य बिस्वास यांची बदली झाली आहे.

कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ अधिकारी आमलान बिस्वास आपला सात जिल्ह्यांचा महसूल कारभार व सहा विभागाचे काम सांभाळत बिम्सचा कारभार सुधारावा यासाठी रात्रंदिवस राबतात, तेथील यंत्रणेला शिस्त लावतात. परंतु, हीच शिस्त तेथील डॉक्टर व अधिकार्‍यांना नको आहे. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल लवकर सुरू होणे, बिम्स या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएटच्या जागा वाढणे, मी सांगतो तसे झाले पाहिजे म्हणणार्‍यांचे आरसींनी न ऐकणे यामुळे संपूर्ण राजकीय यंत्रणा आणि काही अधिकारी त्यांच्याविरोधात एकवटल्याने त्यांची बदली झाली आहे. परंतु, राजकीय अट्टाहासापोटी एका वरिष्ठ अधिकारी बेळगावातून बदलून जात आहे, हे बेळगावकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल. त्यांना रोखण्यासाठी आता जनतेनेच पुढाकार घेतला पाहिजे.

प्रादेशिक आयुक्तांचे काम सात जिल्ह्यांमधील जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लक्ष ठेवणे, भू-लेखाबाबत अथवा जिल्हाधिकार्‍यांबाबत काही तक्रार असेल, तर त्याचे निरसन करणे, इतर सर्व प्रशासकीय कारभारावर नजर ठेवणे यासह अन्य अनेक कामे असतात. यापूर्वी बेळगावात आलेले बहुतांश प्रादेशिक आयुक्त असेच करत होते. परंतु, आमलान बिस्वास यांनी आरसीपदाचा कार्यभार घेतला अन् या कार्यालयाला एक वेगळेच वलय प्राप्त झाले. ते जेव्हा महापालिकेचे प्रभारी होते तेव्हादेखील त्यांनी पालिका गाजवली होती.

जनावरांचा डॉक्टर माणसाचा कसा होऊ शकतो, असे भर बैठकीत बोलत त्यांनी सात वर्षे मनमानी करणार्‍या तत्कालीन महापालिका आरोग्य अधिकार्‍याची तडकाफडकी बदली केली अन् तेथे एमबीबीएस डॉक्टरची नियुक्ती केली. तेव्हाच त्यांच्या कार्याची चुणूक दिसून आली. यानंतर त्यांनी स्मार्ट सिटीच्या कामात लक्ष घातले. स्मार्ट सिटीचे रस्ते व अन्य कामांची पाहणी करत त्यांनी तत्कालीन पालिका आयुक्त व स्मार्ट सिटी एमडींना वेळोवेळी धारेवर धरले. जे त्या अधिकार्‍यांना नको होते. ते लगेचच एका आमदारांच्या वळचणीला गेले, आमदारांनी सूत्रे हलवली अन् आरसींना पालिका प्रभारीपदावरून पायउतार व्हावे लागले.

कोरोना काळात बिम्सचे वाभाडे निघाले अन् तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी बिम्सचे प्रभारी म्हणून आरसी आमलान बिस्वास यांची नियुक्ती केली. बिस्वास यांचा प्रशासनातील वचक आणि रोखठोक निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती होते. म्हणून त्यांनी आरसींना थोडेसे सबुरीने घेण्यास सांगितले. तसे आरसींनी सबुरींने घेतलेदेखील परंतु, वर्षानुवर्षे साचलेली बिम्स आणि जिल्हा रुग्णालयातील घाण साफ करताना ते अनेकदा आक्रमक झाले. परंतु, हा आक्रमकपणा अनेक अधिकार्‍यांना झोंबला. विशेषतः खासगी हॉस्पिटल चालवून लाखांत सरकारी पगार घेणारे व आपला राजकीय प्रभाव असलेल्या डॉक्टरांना हे अधिकच वर्मी लागले. परंतु, आरसींनी त्यांच्या कामाची पद्धत अजिबात बदलली नाही.

बदलीमागे कारणे अनेक
आरसींच्या बदलीमागे अनेक राजकीय कंगोर आहेत. बेळगावचे बिम्स आणि हासनचे हिम्स् (हासन इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स) ही दोन्ही सरकारी वैद्यकीय महाविद्यालये एकाचवेळी म्हणजे 2005 मध्ये सुरू झाली. यानंतर हासन येथे 120 पोस्ट ग्रॅज्युएट (पीजी) जागा मंजूर झाल्या. परंतु, बिम्समध्ये अद्यापही पीजीला मंजुरी मिळालेली नाही.
हासन येथे फारसा राजकीय प्रभाव असलेला नेता नाही. त्यामुळे तेथे सहजरित्या पीजी सीटला मंजुरी मिळाली. परंतु, बेळगावात त्याला मंजुरी न मिळण्याचे कारण म्हणजे खासगी कॉलेज व्यवस्थापनाला बसणारा फटका. 130 पीजी सीटला मंजुरी मिळावी, असे पत्र आरसींनी राज्य शासनाला लिहिले आहे, शिवाय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल 2022 अखेरपर्यंत पूर्ण करावे, अशी सूचनाही त्यांनी कंत्राटदारांना केली आहे.
जर सरकारी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल वेळेत झाले तर खासगीतील रुग्ण कमी होणार परंतु, हीच बाब अनेकांना नको आहे. त्यामुळे फटाफट कामे हातावेगळी करणार्‍या आरसींनाच बदलले तर सर्वच थांबेल, असा विचार करून त्यांची बदली केल्याचे सूत्रांकडून
समजते.

बढतीत अडचणी
सहायक प्राध्यापक म्हणून काम करणार्‍या अनेक डॉक्टरांना तब्बल 17 वर्षांपासून बढती मिळालेली नाही. जे बढतीला पात्र आहेत त्यांना बढती द्यावी व जे स्पेशालिस्ट नसतील त्यांच्या जागी नवीन भरतीस परवानगी द्यावी, असे म्हणत आरसींनी तब्बल 32 जणांची यादी करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवली आहे. ही फाईल सध्या अर्थखात्याकडे असून लवकरच यातील काहींना बढती तर काही नव्या जागांना मंजुरी मिळणार होती. आरसींचा थेट पाठपुरावा असल्याने अर्थमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या या फाईलला हिरवा कंदील दिला आहे. परंतु, हीच बाब येथे वर्षानुवर्षे तळ ठोकून असलेल्या डॉक्टरांना खटकली आहे. कारण, आपण अपात्र ठरलो व आपल्यालाला बढती न मिळता बाहेरील डॉक्टरांना घेतले तर आपले कसे? यातूनच काही दिवसांपूर्वी 32 पैकी 20 डॉक्टरांनी एकत्रित येऊन बैठक घेतली. त्यांनी बैठक घेऊन आधीपासूनच आरसी नको असलेले दोन आमदार, एका मंत्र्यांशी व अन्य एका नेत्याशी संपर्क साधला. आरसी आपलीच कशी मनमानी करत आहेत, हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ज्या राजकीय नेत्यांना ते नको आहेत त्यांना या डॉक्टरांच्या रूपाने आयते कोलित मिळाले व त्यांनी आरोग्य खात्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करत त्यांच्या बदलीची मागणी
केली.
बेळगावपासून काही अंतरावरील एका तालुक्यात तालुका आरोग्य विभागात उच्चशिक्षित कॅन्सर तज्ज्ञ कार्यरत आहेत. खरेतर त्यांची पात्रता इतकी आहे की त्यांनी बिम्स व जिल्हा रुग्णालयात काम करायला हवे. तसे पत्र आरसींनी लिहून त्यांना बिम्समध्ये पाठविण्याची विनंती केली होती. परंतु, तेथील आमदारांनी त्यांना तालुक्यातून सोडण्यास नकार दिला.

‘खाऊ’कट्टा बंद केला
बिम्स व जिल्हा रुग्णालयातील स्टाफ व सफाई कामगार कमी केल्याचा ठपका नेहमीच आरसींवर होतो. परंतु, यामागील सत्यही वेगळेच आहे. आऊटसोर्सिंगद्वारे जी कामगार भरती केली जाते त्यामध्ये जादा कामगार दाखवून कमी कामगार नियुक्ती करायची. उर्वरित कामगार फक्त हजेरीपत्रकावर दाखवून त्यांचा पगार काढला जायचा. त्यामध्ये नंतर वाटणी होऊन ज्याचा त्याचा हिस्सा मिळायचा. ही बाब आरसींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एकाच कंत्राटदाराकडे वर्षानुवर्षे असलेले कंत्राट काढून घेतलेच, शिवाय नवीन कंत्राटदार नेमत हवा तितकाच स्टाफ व सफाई कामगार ठेवले. वरिष्ठ डॉक्टर व कंत्राटदाराचा खाऊ कट्टा बंद झाल्याचा रागही आरसींवर निघत होता असे बोलले जाते.

बेळगावकर मुकणार प्रामाणिक अधिकार्‍याला
प्रादेशिक आयुक्त आमलान बिस्वास हे त्यांच्या आयएएस सेवेनुसार राज्याच्या मुख्य सचिव केडरमध्ये येतात. राज्यातील 350 आयएएस अधिकार्‍यांपैकी ज्या 52 अधिकार्‍यांचा प्रिन्सिपल सेक्रेटरी केडरमध्ये समावेश आहे, त्यामध्ये आमलान बिस्वास यांचा समावेश होतो. राज्य पातळीवरील एखादे सचिव पदावरील आयएएस अधिकारी बेळगावला येतात तेव्हा सकाळी येऊन ते पुन्हा बंगळूरला रवाना होतात. आमलान बिस्वास देखील याच केडरमध्ये येतात. परंतु, आपल्या पदाचा बडेजाव न बाळगता ते नेहमीच बिम्समध्ये बसून तेथील कारभार हाताळत होते. असा अधिकारी बेळगावला मिळणे हे भाग्य होते. परंतु, त्यांच्या बदलीमुळे एका प्रामाणिक अधिकार्‍याला बेळगावकर मुकणार आहेत, हे मात्र निश्‍चित.

Back to top button