कर्नाटक : मुलाचा जीव वाचवण्यासाठी भाबड्या मातेचा देवाकडे धावा | पुढारी

कर्नाटक : मुलाचा जीव वाचवण्यासाठी भाबड्या मातेचा देवाकडे धावा

खानापूर : पुढारी वृत्तसेवा
साध्या तापाचे निमित्त होऊन मुलगा कोमात गेल्याने शाश्‍वती नाही, असे खुद्द उपचार करणार्‍या डॉक्टरांनीच सांगितले. अर्धा तासाची गॅरंटी दिल्यानंतर घरी घेऊन गेलेल्या मुलाची तब्येत आठ दिवस ‘जैसे थे’च राहिली. त्यामुळे डॉक्टरांकडे उपचार करून थकलेल्या मातेने मुलाचे प्राण वाचवण्यासाठी थेट देवाचा धावा सुरू केला आहे. नंदगड (ता. खानापूर) येथील डोंगरावर असलेल्या पवित्र क्रुसासमोर मुलाला ठेवून त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, जोयडा येथील शैलेश कृष्णा सुतरावी (वय 8) हा मुलगा कोमात गेला आहे. आपल्या आजारी मुलाला वाचविण्याच्या इच्छेने जोयडा तालुक्यातील मातेने या क्रुसासमोर मुलाला ठेवून त्याला बरे करण्याची देवाकडे प्रार्थना केली. हुबळीतील प्रसिद्ध डॉक्टरकडे जाऊनही काहीच फायदा झाला नाही. डॉक्टरांनी केवळ अर्ध्या तासाची शाश्वती देऊन या मुलाला आठवडा लोटलाय. त्याचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरूच आहे. ताप न उतरल्याने तो कोमात गेलाय. उपचारासाठी वाट्टेल तितका पैसा खर्च करूनही मुलगा बरा होत नसल्याने आता या मातेने या क्रुसासमोर येऊन देवापुढे आपले गार्‍हाणे मांडले आहे.

डॉक्टरांचे दरवाजे बंद झाल्यावर असहाय्य मातेने आपल्या आजारी मुलाला घेऊन देवाचे दार ठोठावल्याने नंदगड वासियांचेही मन हेलावून गेले आहे. नंदगड गावाच्या पश्चिमेला एका टेकडीवर ऐतिहासिक पवित्र क्रूस (क्रॉस) आहे. अनेक भक्त या क्रूसाचे दर्शन घेऊन नवस बोलतात. येथे बोललेले नवस पूर्णही होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यामुळेच ही माता मुलाचे प्राण वाचवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत आहे.

डॉक्टरांनी त्याच्या मेंदूला ताप चढल्याचे सांगितले. नंतर अर्धांगवायू होऊन त्याच्या अवयवांच्या संवेदना हरपल्या आहेत. मुलाचा जीव वाचावा यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. डबडबल्या डोळ्यांनी स्वतःवर आलेल्या प्रसंगाची माहिती देत कुणावरही अशी वेळ येऊ नये अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे.

डॉक्टरांच्या प्रामाणिक प्रयत्नांची गरज

मुलावर असलेल्या निर्व्याज प्रेमापोटी मातेची भाबडी माया तिच्या ठिकाणी योग्य असली तरी निरागस शैलेशचा जीव वाचवण्यासाठी समाजातील संवेदनशील वृत्तीच्या डॉक्टरांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या प्रामाणिक प्रयत्नातून काहीही सकारात्मक घडू शकते. त्यामुळे शैलेशवर उपचार करण्यासाठी पुढाकार घेतल्यास डॉक्टर म्हणजे देवदूत ही प्रतिमा नक्की सार्थ होऊ शकते.

Back to top button