बेळगाव : खुनातील 7, जाळपोळीतील 19 अटकेत | पुढारी

बेळगाव : खुनातील 7, जाळपोळीतील 19 अटकेत

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : गौंडवाड (ता. बेळगाव) येथे तरुणाच्या खुनानंतर जाळपोळ व काही जणांवर हल्ले झाले. खून प्रकरणी पोलिसांनी सातजणांना अटक केली आहे. यानंतर उडालेल्या भडक्यात वाहने पेटविणे, हल्ला व दगडफेक प्रकरणी पोलिसांनी 19 जणांना अटक केली. शनिवारी रात्री 9 वा. ही घटना घडली. यामध्ये सतीश राजेंद्र पाटील (वय 40, रा. भैरवानथ गल्ली, वडगाव) या तरुणाचा हकनाक बळी गेला.

गौंडवाड येथील भैरवनाथ मंदिरासमोर एक कार लावली होती. यावेळी मंदिराची साफसफाई व पूजा होणार असल्याने सतीश पाटील व काही ग्रामस्थांनी सदर कार बाजूला घेण्यास सांगितली. परंतु, इतकेच कारण भांडणाला पुरेसे ठरले. यानंतर कोयता, जांबियाने सतीश याच्यावर सपासप वार करण्यात आले. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रूग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्याचे कळताच गावातील जमाव संतप्त झाला. त्यांनी गावातील एकेक वाहन जाळण्यास सुरवात केली.

मंदिराजवळच असलेला मालवाहू टेम्पो उलटवला. यानंतर जमावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीमागे असलेली इनोव्हा कार, टाटा सुमो देखील पेटवून दिली. एका घरासमोरील पाण्याचा टँकरही पेटवला. एका ट्रॅक्टरला आग लावत तीन गवतगंज्याही पेटवल्या. यामुळे गावात एकच आगडोंब उसळला.

हा वाद कार बाजूला घेण्यासाठीचा असला तरी या वादाचे मूळ देवस्थानची जमीन व यातून गेल्या अनेक वर्षांपासून गावात दोन गटांत असलेला संघर्ष हाच आहे. वर्षभरापूर्वीही येथे दोनदा जाळपोळीच्या घटना घडलेल्या आहेत. शिवाय सातत्याने हाणामारीच्या घटनाही घडतात. या प्रकरणी काकती पोलिसांत वारंवार तक्रारी झाल्या आहेत. परंतु, पोलिस यावर तात्पुरता तोडगा काढतात आणि दोन्ही गटाला माघारी पाठवतात.

बाळू निलजकर, लखन बाळू निलजकर, सुरेखा बाळू निलजकर, संजना बाळू निलजकर, दौलत मुतगेकर, व्यंकट कुट्रे व आनंद कुट्रे (सर्वजण रा. गौंडवाड, ता. बेळगाव) या सर्वांविरोधात मृत सतीश पाटील यांच्या कुटुंबीयांनी खुनाची फिर्याद दिली आहे.

Back to top button