बेळगाव : मद्यपींचा कहर, त्यात जुगार्‍यांची भर | पुढारी

बेळगाव : मद्यपींचा कहर, त्यात जुगार्‍यांची भर

उचगाव (बेळगाव), पुढारी वृत्तसेवा :  मळेकरणीदेवीच्या नावाने प्रसिद्ध असणारे उचगाव सध्या मद्यपींच्या वाढत्या उपद्व्यापामुळे चर्चेत आले आहे. त्यातच जुगार्‍यांची भर पडली असून रविवारी जुगार खेळणार्‍या 11 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. परिणामी परिसरातील गैरप्रकार रोखण्याची मागणी करण्यात येत आहे.

मळेकरणीच्या यात्रेसाठी प्रत्येक शुक्रवारी आणि मंगळवारी हजारोंच्या संख्येने भाविक येतात. मांसाहारी जेवणाचा बेत असल्याने भाविकांची संख्या अधिक असते. त्यामध्ये मद्यपींचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात मद्यपींकडून महिलांची छेडछाड काढण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या गावकर्‍यांनी त्यामुळे मद्यपींची चांगलीच धुलाई केली होती.

यात्रेसाठी येणारे बहुतांश भाविक मद्यपान करतात. त्यातूनच महिलांची छेडछाड होण्याचे प्रकार घडत आहेत. स्थानिकांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे मद्यपी भाविकांवर निर्बंध आणण्याची मागणी होत आहे.

मळेकरणी आवाराशेजारी असणार्‍या शेतात मद्यपान करून काचेच्या बाटल्या फोडण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. यामुळे आजूबाजूचे शेतकरी वैतागले आहेत. यामध्ये आता जुगार्‍यांची भर पडली आहे.
जुगार वाढता बेळगाव-शहापूर परिसरातील काहीजण 11 जण जुगार खेळताना पोलिसांना सापडले असून गावकरी धास्तावले आहेत. यामध्ये गावातील युवक अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिणामी येथे चालणारे गैरप्रकार रोखण्याची मागणी करण्यात येत आहे.
वाहतूक कोंडीही मळेकरणी देवीच्या दर्शनाला बेळगाव, खानापूर, चंदगड, आजरा भागातून भाविक येत असतात. त्यांना वाहतूककोंडीचाही सामना करावा लागत आहे. वाहने रस्त्यावर उभी केली जातात. परिणामी सार्‍यांनाच कसरत करावी लागते. यातून वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस तैनात करण्याची आवश्यकता आहे. यासाठी ग्रा. पं. ने पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाविकांसह गावकर्‍यांतून होत आहे.

पोलिस बंदोबस्ताची गरज
यात्रेसाठी हजारो भाविक येत असतात. यामध्ये महिलांची संख्या मोठी असते. त्याचा गैरफायदा मद्यपींकडून घेण्यात येतो. यातून छेडछाडीचे प्रकार घडत असून असे प्रकार रोखण्यासाठी यात्रेदिवशी पोलिस बंदोबस्त ठेवण्याची मागणी होत आहे.

Back to top button