बाळासाहेब पाटील, पुढारी ऑनलाईन: शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांचे गुरुशिष्याचे नाते सर्वश्रूत आहे. यशवंतराव चव्हाण यांनी पवार यांना राजकारणात ब्रेक दिला आणि मोक्याच्या क्षणी पाठिंबा देत सर्वोच्च पदावर काम करण्याची संधीही दिली.
शरद पवार यांनी युवक काँग्रेसमधून आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली. पवार यांच्या घरची राजकीय पार्श्वभूमी वेगळी म्हणजे बिगर काँग्रेसी होती.
मात्र, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी प्रेरित होऊन पवार काँग्रेसकडे ओढले गेले. त्यांच्या आई संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये कार्यरत होत्या. तरीही पवार काँग्रेसकडे ओढले गेले.
पुढे याच पवार यांना अनेक पदे मिळाली आणि राष्ट्रीय नेते ही ओळख ठळक झाली. त्यांच्या या प्रवासात यशवंतराव चव्हाण यांनी वेळोवेळी महत्त्वाची भूमिका बजावली.
शरद पवार यांनी पक्षसंघटनेत काम करायला सुरू केल्यानंतर त्यांना पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले.
त्यानंतर बॅरिस्टर अंतुले विधानसभेवर निवडून गेल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपद पवार यांच्याकडे आले.
त्यानंतर अनेक पवार यांनी युवकांचे संघटन केले. त्या जोरावर विधानसभेची जोरदार तयारी त्यांनी केली.
मात्र, काँग्रेसमध्ये स्थानिक संघटनांना मोठे महत्त्व असल्याने ते ज्यांची शिफारस करतील त्यांनाच उमेदवारी दिली जात होती.
अधिक वाचा:
स्थानिक संघटना प्रदेश काँग्रेसकडे ज्यांची शिफारस करत असत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत असे. दिल्लीत एखाद दुसरे नाव बदलत असे.
काँग्रेसचे नेते विनायकराव पाटील यांनी पवार यांना अर्ज भरण्यास सांगितले.
मात्र, स्थानिक संघटनेत पवार यांना विरोध झाला. 'आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या पण शरदला उमेदवारी नको' असे उमेदवारी अर्ज भरलेल्यांपैकी सर्वांचे मत होते. त्यानुसार ११ विरुद्ध १ असा ठराव प्रदेश काँग्रेसकडे पाठविला.
त्यावेळी पुढे जी चर्चा झाली त्यात यशवंतराव चव्हाण यांनी बिनतोड युक्तिवाद केला आणि शरद पवार यांना उमेदवारी दिली.
हा सर्व किस्सा पवार यांनी आपले 'लोक माझे सांगाती' आत्मचरित्रात लिहिले आहे.
ते म्हणतात, 'शिफारस प्रदेश काँग्रेसच्या संसदीय समितीत चर्चेला आले. त्या वेळी प्रदेशाची बैठक चव्हाणसाहेबांच्या 'रिव्हएरा' या निवासस्थानी होत असे.
इच्छुकांच्या मुलाखीत आणि बैठका सुरू असताना बाकीचे सगळे समुद्र किनाऱ्यावर फिरायला जायचे. मी संसदीय मंडळाचा सदस्य होतो, पण बारामती उमेदवाराच्या मुलाखतीवेळी थांबलो नाही.'
या बैठकीत यशवंतराव चव्हाण यांनी चर्चेवेळी एका नेत्याला प्रश्न केला, 'महाराष्ट्रात विधानसभेच्या 270 जागापैकी किती जागांवर काँग्रेस विजयी होईल?'
यावर ते म्हणाले, 'एकशे सत्तर ते दोनशे जागांवर विजय नक्कीच मिळेल.' यावर चव्हाण यांनी प्रतिप्रश्न केला. 'याचा अर्थ आपले ऐंशी उमेदवार पराभूत होतील का?' संबधित नेत्यानं तशी शक्यता असल्याचे सांगितले.
चव्हाण म्हणाले, 'ठीक आहे, मग बारामतीची आणखी एक जागा गेली, असं समजा आणि शरदलाच उमेदवारी द्या'
यशवंतराव चव्हाण यांच्या या प्रतिप्रश्नाने पवार यांची उमेदवारी पक्की झाली आणि संसदीय कारकीर्द सुरू झाली. चव्हाण यांनी दाखविलेल्या विश्वासानुसार पवार जिंकले आणि आमदार झाले.
याबद्दल ते लिहितात, 'मतदारांनी, चव्हाणसाहेबांनी आणि पक्षश्रेष्ठींनी दाखविलेला विश्वास सार्थ करणं ही माझी नैतिक जबाबदारी होती. चव्हाणसाहेबांचा आदर्श आणि अनेक नामवंतांबरोबर झालेल्या चर्चांमुळे लोकप्रतिनिधीबाबत माझ्या स्वत:च्या काटेकोर धारणा झाल्या होत्या.
चव्हाणसाहेबांचा माझ्यावर प्रभाव होता तशी तेही माज्यावर विश्वासाने जबाबदारी टाकत. राजकारणात माणसं निवडणुकांपुरती न राहता दीर्घकाळ टिकणारी, विचार करणारी असावीत असा त्यांचा आग्रह असे.'
इंदिरा गांधी यांनी १९७५ यांनी आणीबाणी लावल्यानंतर काँग्रेसअंतर्गत अनेकांची कुचंबणा झाली. त्यात यशवंतराव चव्हाण यांच्या गटातील अनेक नेते होते.
पुढे लोकसभेला काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर महाराष्ट्रातील शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले.
१९७८ ला इंदिरा गांधी पक्षातून बाहेर पडल्या. त्यानंतर ब्रह्मानंद रेड्डी यांची काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांची काँग्रेस असे पक्षीय फूट पडली. यशवंतराव आणि त्यांचे सहकारी रेड्डी काँग्रेसमध्ये होते.
महाराष्ट्रात रेड्डी काँग्रेसचे वसंतदादा मुख्यमंत्री तर इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री होते. तिरपुढे वादग्रस्त वक्तव्ये करून आपल्याच सरकारला अडचणीत आणत असत.
त्यातून सरकारमध्ये बेदिली माजली. तिरपुडे यांच्या वक्तव्याने नाराज झालेले वसंतदादा जनता पक्षाशी हातमिळवणी करण्याच्या विचारात होते.
त्याला यशवंतराव आणि शरद पवार यांचा विरोध होता. त्यामुळे यशवंतरावांनी 'हे सरकार पडावे' अशी इच्छा व्यक्ती केली. हा वर्तमानपत्रांतील इशारा ओळखून पवार यांनी आमदारांची जमवाजमव केली आणि सरकार पाडले.
याबाबतचा एक किस्सा पवार यांच्या आत्मचरित्रात आहे, 'सरकारमधील अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर आम्ही चव्हाणसाहेबांना दिल्लीत भेटलो.
अधिक वाचा
सरकारबाबत ते अजिबात समाधानी नव्हते. त्यांनी 'सरकार पाडा' असे थेट सांगितले नाही. तरीही या सरकारबोबर फरफट करण्याची गरज नाही. असे सूचित केले. चव्हाणसाहेब,वसंतदादा यांच्या भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आम्ही जुळवाजुळवीला लागलो.'
पुढे इंदिरा गांधी यांनी या सगळ्यात हस्तक्षेप केल्यानंतर यशवंतरावांची कोंडी झाली. पण आपल्या शिष्याचे अस्तित्व पणाला लागल्यानंतर मात्र, त्यांनी मुत्सदीपणे खेळी खेळली.
त्यांनी पवार यांच्यासह सहकाऱ्यांना फोन केला आणि 'सरकार पाडण्याचा तुम्ही घेतलेला निर्णय थांबवा' असे सांगितले. चव्हाण यांनी सांगितल्याने पवार यांची अडचण झाली.
'आमचे राजीनामे यापूर्वीच वसंतदादांकडे पोचलेआहेत. पण ठीक आहे. तुमचं जे म्हणणं आहे, त्याप्रमाणे आम्ही या विषयावर पुढे काहीही करणार नाही. तुमच्या शब्दाखातर जी राजकीय कंमत आता आम्हाला मोजावी लागेल, त्यासाठी आमची तयारी आहे.' असे एखाद्या पट्टशिष्याला शोभेल असे पवार यांनी सांगितले.
त्यावर किसन वीर यांनी चव्हाण यांची समजूत काढली आणि सरकार पडले. शरद पवार पुलोद सरकार स्थापन करून मुख्यमंत्री झाले.
पवार यांनी आपल्या गुरुच्या पावलावर पावले टाकत दिल्ली पादाक्रांत केली. यशवंतराव देशाचे संरक्षण मंत्री होते, पवारही राज्याची मुख्यमंत्री झाले.
चव्हाण यांनी ज्या तत्वांवर आणि मूल्यांवर आपले राजकारण केले त्याच पायवाटेने जाण्याचा मी नेहमी प्रयत्न करतो, असे पवार आवर्जून सांगतात.
हेही वाचलेत का
पहा व्हिडिओ: शरद पवार आपल्यावरील आरोपांना उत्तरे का देत नाहीत