नाशिक : अखेर रसिका आसिफचा आंतरधर्मिय विवाह संपन्न | पुढारी

नाशिक : अखेर रसिका आसिफचा आंतरधर्मिय विवाह संपन्न

नाशिक; पुढारी ऑनलाईन : रसिका आसिफचा बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह अखेर पार पडला. या विविहास काही धार्मिक संघटनांनी कडाडून विरोध केल्यामुळे हा विवाह वादाचा विषय बनला होता. अखेर या विरोधास डावलून रसिका आडगावकर व आसिफ खान गुरुवारी (दि. २२) विवाह बंधनात अडकले.

रसिका आणि आसिफ हे दोघे आंतरजातिय विवाह करणार होते. पण, रसिकाच्या जातीच्या जात पंचायत व काही धार्मिक संघटनांनी या विवाहास कडाडून विरोध केला होता. पण या विरोधास डावलून रसिका व आसिफ यांनी गुरुवारी हॉटेल एसएस येथे मोजक्याच व्यक्तीच्या उपस्थितीत लग्न केले.

रसिका आसिफ

रसिका ही हिंदू धर्मिय तर आसिफ हा मुस्लीम धर्मिय आहे. ही दोघे एकमेकांवर प्रेम करत असल्याने दोघांनी हा आंतरधर्मिय विवाह करण्याचे ठरवले. दोघांनी आपल्या कुटुंबियांना याबाबतची कल्पना दिली. कुटुंबियांनी सुद्धा दोघांवर विश्वास दाखवत लग्नास होकार दिला. दोघांनी ही हिंदू पद्धतीने विवाह करण्याचे ठरवले. पण, या लग्नास काही धार्मिक संघटनांनी विरोध केला. तेव्हा व्यथित होऊन दोघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

या दोघांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतल्यावर समाजमाध्यांतून विरोध करणाऱ्या संघटनांचा निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्यावर टीका ही करण्यात आली. अनेकांनी रसिका व आसिफला पाठिंबा दिला. अखेर या दोघांच्या मदतीस शहरातील पुरोगामी संघटना धावूण आल्या.

अखेर रसिका व आसिफने हिंदू व मुस्लीम अशा दोन्ही पद्धतीने गुरुवारी लग्न केले. या विवाह सोहळ्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल व छात्रभारती यांचे कार्यकर्ते पाठिंब्यासाठी हजर होते. मुलाचे मामा म्हणून अंनिसचे पदाधिकारी कृष्णा चांदगुडे यांनी मामाचे विधी पार पाडले. संविधानाला अभिप्रेत असणारी ही कृती असल्याचे समाधान कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. अनेक पुरोगामी संघटनांनी या विवाहाला पाठींबा दर्शविला होता.

कुटुंबियांची नामदार बच्चू कडू यांनी भेट घेतली होती. अंनिसच्या नाशिक येथील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी कुटुंबियांची भेट घेतली होती. पोलीस आयुक्तांना संबंधित विवाहाला विरोध करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निवेदन दिले होते.

Back to top button