सरकारमधील मंत्र्यांचे शरद पवारांनी प्रशिक्षण घेतले पाहिजे : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

सरकारमधील मंत्र्यांचे शरद पवारांनी प्रशिक्षण घेतले पाहिजे : चंद्रशेखर बावनकुळे

धुळे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील महाआघाडीचे सरकार हे मुंबईपुरते मर्यादित आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत. नेहमी प्रसिध्दीसाठी वेगवेगळी स्टेटमेंट करुन प्रसिध्दीत राहण्याचा प्रयत्न करणारे हे सरकार शेतकरी व शेतमजुरांच्या समस्या दुर करु शकत नाही. या तीनही पक्षाच्या सरकारमधील मंत्र्यांचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रशिक्षण घेतले पाहिजे, अशी टिका माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळ्यात केली.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की,  राज्यात अराजकतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या वीजेच्या जोडण्या तोडण्याचे पाप हे सरकार करीत आहेत.

महाआघाडीचे मुख्यमंत्री शेतकरी व समस्याग्रस्तांना भेटत नाही. तर आघाडीच्या पक्षांमधील संजय राऊत व नाना पटोले हे केवळ प्रसिध्दीसाठी काम करीत आहेत.

केवळ चर्चेत राहण्याचे काम

या सरकारमधील नेते वेगवेगळया वाक्य वापरुन केवळ चर्चेत रहाण्याचे काम करत आहे. अशा सरकारला जनता त्यांची जागा दाखवणारच आहे. ओबीसीचा प्रश्न काँग्रेसचे नेते न्यायालयात गेल्यानंतरच निर्माण झाला आहे.

या सरकारने तीन महीन्यात ओबीसींचे जनगणना केल्यास हा प्रश्न सहज सुटु शकतो. पण हे सरकार ओबीसींच्या विरोधात असा आरोप त्यांनी केला.

धुळ्यात संपर्क अभियानासाठी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रात पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नारायण पाटील , महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समितीचे सभापती संजय जाधव, जिपचे अध्यक्ष तुषार रंधे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी या युवा वॉरियर्स अभियानाची माहिती दिली. राज्यातील तरुणांमधे नकारात्मक उर्जा तयार झाली असून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

राज्यात 97 हजार 643 मतदार केंद्र असून त्यावर 25 लाख युवा वॉरियर तयार करण्यात येणार आहे. ही नेमणूक शहरात वॉर्डनिहाय तर ग्रामीण भागात बुथ व ग्रामपंचायत निहाय केली जाणार आहे.

या बरोबरच एका हेल्थ वर्करची नेमणूक केली जाणार आहे. त्यांच्या माध्यमातुन कोरोनाच्या तिस-या लाटेत जनतेला आरोग्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button