पुणे; पुढारी वृत्तसेवा : सदानंद शेट्टी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत भाजपला सोडचिठ्ठी दिली. महापालिका निवडणुकीला सहा- सात महिन्यांचा अवधी बाकी असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपवासी झालेले स्थायी समितीचे अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेशाने माजी खासदार, भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांच्या गटाला ही धक्का बसला आहे.
शेट्टी यांच्या पत्नी काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आहेत. दीड वर्षांपुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सदानंद शेट्टी यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. माजी खासदार काकडे यांनी शेट्टी यांना भाजप घेऊन कॉंग्रेसला धक्का देण्याचे काम केले होते.
पुणे केंटॉमेन्ट मतदारसंघात भाजपच्या विजयाला हा पक्ष प्रवेश महत्वाचा ठरला होता. मात्र, आता पालिका निवडणुकिला सात महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले आहे. तर याशिवाय माजी स्थायी समिती अध्यक्ष आणि काँग्रेसचे जुने नेते श्रीकांत शिरोळे यांनाही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
याशिवाय वानवडी भागातील भाजपचे प्रफुल्ल जांभुळकर आणि काँग्रेसचे केव्हीन मॅन्युअल यांनाही राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते. पक्ष देईल ती जबाबदारी घेऊन पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे यावेळी शेट्टी आणि शिरोळे यांनी सांगितले. तर ही फक्त सुरवात असून आगामी काळात भाजप मधील अनेक जण राष्ट्रवादीत प्रवेश करतील असे शहराध्यक्ष जगताप यांनी सांगितले.