सुनील माळी
''गणपती उत्सवात चक्कर मारा..., नेहमीप्रमाणं मस्तानी खाताखाता गप्पा मारू...'' सुरेशरावांचा दरवर्षीचा हा प्रेमळ आग्रह गेल्या गणपती उत्सवाआधीही होता. उत्सवाच्या आधी फोनची रिंग वाजली आणि स्क्रीनवर 'सुरेश पवार, निंबाळकर तालीम मंडळ' असं नाव झळकलं की ओळखायचं... उत्सवाचं आमंत्रण देण्यासाठी हा फोन आहे.
वास्तविक, निंबाळकर तालीम मंडळात उत्सवामध्ये जाण्यासाठी अशा औपचारिक आमंत्रणाची गरज बिलकुलच नसायची. उत्सवाचे दोन-तीन दिवस उलटले की पावलं सदाशिव-शनिवार-नारायण पेठांतील मंडळांना भेट द्यायला आपोआपच चालू लागायची आणि पहिल्याच टप्प्यात निंबाळकर तालमीपर्यंत ती पोचायची. उत्सवाचा मांडव रस्त्याच्या एका कडेला तिरपा घातलेला असायचा आणि समोरच्या रस्त्यावर म्हणजे (अस्सल पुणेकरांना कळेल असं सांगायचं तर लोणीविके दामले यांच्या गल्लीच्या सुरूवातीलाच) पाहुणे-पदाधिकारी-कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र मांडव घातला जायचा. रात्री अकरा-साडेअकरा वाजण्याच्या सुमाराला मांडवापर्यंत पोचलो की त्या मांडवातली झब्बा-पायजमा घातलेली उत्साहमूर्ती दिसायची... तेच सुरेश पवार...
मला काय किंवा येणाऱ्या इतर पाहुण्यांनाही पाहून त्यांना कोण आनंद व्हायचा ?... मी तसंच माझ्याबरोबरच्या माझ्या मित्रांना मांडवातल्या खुर्च्यांवर आपल्या शेजारी ते बसवत आणि उत्सवाच्या गप्पा सुरू होत... सुरेशरावांनी त्यांच्या वयाच्या पंधराव्या वर्षांपासून उत्सवात कार्यकर्ता म्हणून भाग घ्यायला सुरूवात केलेली अन त्यानंतरचा तब्बल पासष्ट वर्षांचा उत्सव कार्यकर्ता म्हणून साजरा केलेला... उत्सवाच्या एकशेतीस-एकतीस वर्षांतल्या जवळपास निम्म्या उत्सवाचे ते साक्षीदार होते... निव्वळ साक्षीदारच नव्हे तर सक्रिय कार्यकर्ते होते. त्यामुळंच साडेसहा दशकांत उत्सव कसा बदलत गेला ?, त्याची त्यांना चांगलीच माहिती. उत्सवाची वळणं-वाटा, त्यांतील प्रवाह त्यांना बारकाईने माहिती असे. ते स्वाभाविकच होते कारण त्यांच्यासारख्या उत्साहाने न्हायलेल्या कार्यकर्त्यांच्या जिवावरच उत्सव उभा होता. आम्ही एकोणिसशे साठच्या दरम्यानच्या उत्सवाच्या सजावटीची, आराशीची माहिती त्यांना विचारत असू आणि तेही तेव्हाचे देखावे कसे होते ?, सजावट कशा रितीने केली जाई ?, ते सांगत.
''उत्सव आता बदलत चालला...'' ''वर्गणी मागणारे आणि आवर्जून देणारे यांची संख्या तुलनेनं कमीकमी होत चालली...'' ''उत्सव आता चालतो तो जाहिरातीच्या मंडपांवर...'' ''उत्सव साजरा करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय ?...'' वेळोवेळी झालेल्या गप्पांमधली त्यांची ही वाक्यं आमच्या कायमची लक्षात राहात.
गप्पांनंतर आम्हाला गणेश मूर्तीसमोर नेलं जाई... निंबाळकर तालमीची गणेश मूर्ती म्हणजे शिल्पकारानं कोरलेलं काव्यच आहे... त्या मूर्तीचा सुरेशरावांना कोण अभिमान होता ?, तिच्यावर त्यांची श्रद्धा होती. अशाच एका वर्षी सुरेशराव मी काम करत असलेल्या ऑफिसात आले...
''सुनीलराव, आपल्या मंडळाच्या मूर्तीवर मला मंडळाच्या अहवालात लेख लिहायचायं..., पण तुमच्यासारखं लिखाण मला जमणार नाही, मी तुम्हाला माहिती सांगतो, तुम्ही ती माझ्यासाठी शब्दांत मांडा...''
सुरेशरावांची ही विनंती म्हणजे त्यांना मनापासून मानणाऱ्या मला आदेशच होता... ते मूर्तीची माहिती सांगत गेले, त्याचे मुद्दे मी उतरवत गेलो आणि ती माहिती ऐकताऐकता थक्कही होत गेलो... श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची गणेश मूर्ती घडवणाऱ्या शंकर अप्पा शिल्पी यांच्याकडून आपल्याही मंडळाची मूर्ती घडवावी, अशी इच्छा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची होती, मात्र त्यांचे चिरंजीव नागेश शिल्पी यांच्या हातून ती घडावी, असा योग होता... त्यांच्या हातून उतरलेली ती देखणी, पाणीदार डोळ्यांची मूर्ती पाहिल्याशिवाय, तिच्या दर्शनाशिवाय पुणेकरांचा गणेशोत्सव पुरा होत नाही...
सुरेशरावांच्या माहितीला माझ्याकडून देण्यात आलेल्या शब्दरूपातला काही अंश असा होता...
प्रत्येक घटनेचा एक योग असतो आणि त्या योगानुसारच त्या गोष्टी होतात. एखादी घटना कशी व्हावी, हे आधीच ठरलेले असते, असे म्हटले जाते. आमच्या निंबाळकर तालीम गणेशोत्सव मंडळाची गणेश मूर्ती दगडूशेठ हलवाई गणपतीसारखी व्हावी आणि पहिल्या ध्यानस्थ जटाधारी मूर्तीसारखी ती असावी, अशी मंडळाची इच्छा होती, पण योग होता शंकर अप्पांचे चिरंजीव नागेश यांच्या हातून ती घडावी आणि तीही जटाधारी नव्हे तर आशीर्वाद देणारी व्हावी असा...
... पुण्याच्या दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या विश्वस्तांनी नवी मूर्ती करायचे ठरवले... ख्यातनाम शंकर अप्पा शिल्पी यांना विनंती केली... त्यांनी सुरेख मूर्ती घडवली..., मंडळाच्या सुवर्ण महोत्सवाच्या धामधुमीतून मोकळे झालेल्या आमच्याही मंडळाला असे वाटले की आपण त्यांच्याकडूनच मूर्ती घडवू...., पण 'मागते मन एक काही, दैव दुसरे घडवते...' शंकर अप्पांनी जिलब्या मारूती मंडळाच्या श्रींची मूर्ती घडवण्याचे काम सुरू केले, मात्र त्याच वेळी त्यांना अर्धांगवायुचा झटका आला. त्यामुळे शंकर अप्पा शिल्पी यांनी पुण्यात घडवलेली एकमेव मूर्ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टची ठरली... शंकर अप्पांचे चिरंजीव नागेश यांना निंबाळकर तालीम मंडळाकडून विनंती करण्यात आली. मंडळाची आधीची मूर्ती ही जटाधारी ध्यानस्थ मुद्रेतील होती, त्यामुळे नवी मूर्तीही तशीच असावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता, तथापि गणेश मूर्ती ही आशीर्वादपर मुद्रेतीलच हवी, असे नागेश यांचे म्हणणे होते. ते आपल्या विचाराशी ठाम होते... या योगायोगाच्या गोष्टी घडत असताना आणखी एक योग आला. मूर्ती घडवली जात असतानाच्या काळात चंद्रग्रहण आले.
नागेश यांनी धार्मिक विधी करायला सांगितले. त्याचबरोबर मूर्तीच्या पोटात विधीपूर्वक पंचधातूच्या दीड फूट लांब आणि दीड फूट रूंदीच्या पत्र्यावर ग्रहणकाळात गणेशमंत्र कोरण्यात आले. तसेच दुसऱ्या बाजूला मंडळाच्या सभासदांची नावे कोरण्यात आली आणि तो पत्रा मूर्तीच्या पोटात कायमस्वरूपी ठेवण्यात आला... जुनी मूर्ती दोन ते पाच फूट उंचीची होती तर नवी मूर्ती पाच ते सहा फूट होणार होती. त्यामुळे मूर्ती कुठे ठेवायची, हा निर्माण झालेला प्रश्न सुलोचना अक्का गोलांडे यांनी सोडवला. शनिपाराजवळच्या आपल्या जागेत त्यांनी मूर्ती ठेवायला परवानगी दिली, एवढेच नव्हे तर तब्बल ३५ वर्षे तिची मनोभावे पूजाही केली... अशा १९७२ मध्ये घडवलेल्या मंडळाच्या अत्यंत देखण्या, प्रासादिक, पाणीदार डोळ्यांच्या श्रींना आता पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. जेव्हाजेव्हा या मूर्तीला मी मन:पूर्वक नमस्कार करतो तेव्हा तेव्हा माझ्या डोळ्यांपुढे हा इतिहास उभा राहातो...
सुरेशरावांच्या भावना आणि अनुभव शब्दांत उतरवताना खूप समाधान होत होते. त्यांचा लेख मंडळाच्या अहवालात प्रसिद्ध झाला...
सुरेशरावांचा व्यवसाय लाकडी वस्तू तयार करण्याच्या सुताराचा. ते आणि त्यांचे चिरंजीव पूर्व भागातल्या बहुधा नाना पेठेतल्या जागेत तो व्यवसाय करीत. वयोमानामुळं हळूहळू त्यांनी व्यवसाय मुलाच्या स्वाधीन केला, तरी त्यांना कारखान्यात चक्कर मारल्याशिवाय चैन पडत नसे. त्यांचे निवासस्थान सहकारनगरला. ते घरून कारखान्यावर जाताना वाटेत लागणाऱ्या आमच्या 'पुढारी' कार्यालयात अधूनमधून थांबत, त्यांच्याशी पाच-दहा मिनिटं गप्पा होत आणि मग ते पुढे मार्गी लागत. उत्सव आला की मात्र त्यांचा पाय मंडळातून निघत नसे...
'पुढारी'तर्फे गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक उत्सवाच्या आधी घेण्याचा उपक्रम आम्ही सुरू केला होता. त्या प्रत्येक बैठकीला सुरेशराव आवर्जून उपस्थित असत आणि त्यांना मानानं मी पहिल्या रांगेत बसवे, मात्र गेल्या वर्षीच्या उत्सवाच्या बैठकीत माझ्या मनात का कोण जाणे आले की सुरेशरावांना व्यासपीठावर बसवू. मंडळाचेच नव्हे तर संपूर्ण उत्सवाचेच ८२ वर्षांचे ज्येष्ठ सल्लागार-कार्यकर्ते सुरेशराव या नात्यानं तसंच वडिलकीच्या नात्यानं त्यांना वर बसवलं... उत्सव आला आणि नेहमीप्रमाणं त्यांचा फोन आला... मंडळात कधी येताय ?..., मस्तानी आईस्क्रीम तुमची वाट पाहातंय... मी येण्याचा शब्द दिला..., मंडळानं गेल्या वर्षी अफजलखान वधाचा जिवंत देखावा सादर केला होता, तो इतका बहारीचा झाला की तो पाहायला प्रचंड गर्दी होत असे... मी रात्री साडेदहाच्या सुमारास गर्दीतून वाट काढत मंडळाच्या मांडवात पोहोचलो तर सुरेशराव नव्हते. त्यांना फोन केला तर ते म्हणाले, 'मी आत्ताच घरी परतलो..., पण उद्या थोडं आधी या...' मी यायचा शब्द दिला, पण नंतर जाणं जमलं नाही...
... परवा सुरेशरावांनी एक व्हॉट्स अप मेसेज पाठवला... 'सुरेशरावांनी काय पाठवलंय बरं ?' असं म्हणत मी उघडला तर त्यांचाच फोटो पाठवला होता. मला उलगडा होईना..., पण मजकूर वाचल्यावर एकदम 'अरे बापरे...' असे उ्दगार बाहेर पडले... सुरेशराव आपल्यातून निघून गेले होते आणि त्यांच्या अंत्यविधीचा मजकूर त्यांच्या चिरंजिवांनी सुरेशरावांच्याच मोबाईलमधून पाठवला होता... जिन्यावरून पडल्यानं मेंदूला मार लागला अन काही दिवस झुंज देऊनही त्यातून वाचण्यात त्यांना यश आलं नाही...
वैकुंठात सुरेशरावांच्या दोनही चिरंजीवांना भेटलो तशी त्यातला एकजण म्हणाला, ''तुमचं, शिरीष मोहितेंचं नाव घरातल्या गप्पांत त्यांच्या तोंडी कायमच असायचं...'' त्यावर ''हो, आमच्याही आयुष्यात सुरेशरावांचं वेगळंच स्थान होतं'', मी पुटपुटलो.
सुरेशराव..., तुम्ही दिलेल्या मस्तानी आईस्क्रीमच्या आमंत्रणाचा मान यंदा मला पुरा करता आला नाही... याची रूखरूख कायम राहील...