

MPSC objective exam answer sheet new rules
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतल्या जाणाऱ्या विविध वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत व्यापक बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भातील अधिकृत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून, हे नवीन बदल १ मार्च २०२६ नंतर होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी लागू होणार आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिध्दीपत्रक नमूद केले आहे की, मूळ उत्तरपत्रिका दोन भागांत विभागली जाईल. ती भाग-१ आणि भाग-२ अशी असेल. भाग-१: हा भाग केवळ उमेदवारांना प्रश्नांची उत्तरे नोंदवण्यासाठी असेल. तर भाग-२ : यामध्ये उमेदवाराचे नाव, बैठक क्रमांक, विषय संकेतांक, प्रश्नपत्रिका क्रमांक आणि स्वाक्षरी यांसारखा वैयक्तिक तपशील असेल.
परीक्षा संपल्यानंतर समवेक्षक उत्तरपत्रिकेतील भाग-१ आणि भाग-२ वेगळे करतील. यामुळे उत्तरपत्रिकेच्या मूल्यमापन प्रक्रियेत अधिक गोपनीयता राखली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली आहे.
सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आता उत्तरपत्रिकेवर चार ऐवजी पाच पर्याय असतील. उमेदवाराला एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नसेल, तर त्याला पाचवा पर्याय निवडणे अनिवार्य आहे. प्रत्येक प्रश्नासाठी पाच पैकी एक तरी वर्तुळ छायांकित करणे आवश्यक आहे. उमेदवाराने पाच पैकी एकही वर्तुळ रंगवले नाही, तर त्या प्रश्नासाठी २५% (१/४) गुण वजा केले जातील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
उमेदवारांचा बैठक क्रमांक आता ८ अक्षरी ऐवजी ७ अंकी असेल. विशेष म्हणजे, हा बैठक क्रमांक संबंधित जाहिरातीच्या संपूर्ण निवड प्रक्रियेसाठी कायम स्वरूपी राहणार आहे.
चुकीचे उत्तर देणे, पाचपैकी एकही पर्याय न निवडणे, एकापेक्षा जास्त वर्तुळे छायांकित करणे, उत्तरामध्ये खाडाखोड किंवा दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकरणांमध्ये प्रत्येक प्रश्नामागे २५% किंवा १/४ गुण एकूण गुणांमधून वजा केले जाणार आहेत. तसेच गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरी ती तशीच ठेवली जाणार आहे.
उत्तरपत्रिकेवर विहित ठिकाणी स्वाक्षरी केली नाही. काळ्या बॉल पॉईंट पेनव्यतिरिक्त इतर पेन वापरणे, उत्तरपत्रिकेवर अनावश्यक चिन्हे किंवा मजकूर लिहिणे, प्रश्नपुस्तिका क्रमांक नमूद न करणे, उत्तरपत्रिकेवरील QR कोड किंवा टायमिंग ट्रॅक खराब करणे आदी चुका उमेदवारांनी केल्यास त्यांची उत्तरपत्रिका अवैध ठरवली जाईल, असेही आयोगाने प्रसिध्दीपत्रक नमूद केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग उत्तरपत्रिकेत केलेले सर्व सुधारित नियम आणि नवीन उत्तरपत्रिका पद्धत १ मार्च २०२६ पासून आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व भरती प्रक्रिया आणि परीक्षांसाठी लागू होईल. उमेदवारांना मार्गदर्शनासाठी सविस्तर सूचना उत्तरपत्रिकेच्या दुय्यम प्रतीच्या (कार्बनलेस कॉपी) मागे देण्यात येणार आहेत, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.