Pune Crime: प्रेमसंबंधातून तरुणाचा निर्घृण खून; आंबेगाव परिसरात खळबळ
पुणे : प्रेमप्रकरणातून तरुणाचा धारधार शस्त्राने वार करून दोघांनी खून केला. जावेद खाजामियाँ पठाण (वय ३४, ख्वाजानगर, शनी मंदिराजवळ, भोकर, जि. नांदेड) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी संदीप रंगराव भुरके (वय २५) याच्यासह त्याच्या साथीदाराविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रौफ उस्मान शेख (वय ३५, सध्या रा. भूमकर चौक, नऱ्हे, मूळ रा. ख्वाजानगर, भोकर, जि. नांदेड) याने फिर्याद दिली आहे. ही घटना 22 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास गुरूदत्त वॉशिंग सेंटर गायमुख चौक आंबेगाव परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झाललेला तरुण जावेद पठाण हा फिर्यादी रौफ शेख याचा नातेवाईक आहे. जावेद आंबेगाव येथील वॉशिंग सेटरवर काम करत होता. आरोपी संदीप भुरकेच्या नात्यातील एका तरुणीसोबत त्याचे चार-पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हे सर्वजण एकाच गावचे राहणारे आहेत. संदीपला त्याच्या नात्यातील तरुणीचे जावेदसोबत असलेले प्रेमसंबंध मान्य नव्हते.
अशातच जावेद त्या तरुणीला गावाकडून आपल्यासोबत पुण्यात घेऊन आला होता. त्यामुळे संदीप त्याच्यावर चिडला होता. संदीपला जावेद आंबेगाव परिसरात कोठे काम करतो, याची माहिती मिळाली होती. त्याने आपल्या एका साथीदाराला सोबत घेऊन त्याच्यावर धारधार शस्त्राने वार केले. जावेदच्या डोक्यात आणि पाठीवर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी धाव घेतली. जावेदला सुरूवातीला उपचारासाठी आंबेगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
परंतु, त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळी पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी भेट दिली. आरोपी संदीप भुरके आणि त्याचा साथीदार फरार आहेत. आंबेगाव पोलिस आणि गुन्हे शाखेची पाच पथके दोघांच्या मागावर रवाना झाली आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक गुन्हे गजानन चोरमले करत आहेत.
आरोपी संदीप भुरके याच्या नात्यातील तरुणीसोबत जावेद याचे प्रेमसंबंध होते. त्या कारणातून भुरके याने आपल्या साथीदाराला सोबत घेऊन जावेद याचा खून केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
शरद झिने, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आंबेगाव पोलिस ठाणे

