

पुणे: येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे राजकीय वातावरण तीव झाले आहे. मोठ्या संख्येने नेते भाजपमध्ये सामील होत आहेत. शहरात शिवसेनेला (ठाकरे गट) पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा दुसरा टप्पा मंगळवारी संपला. यादरम्यान, ठाकरे सेनेचे प्रमुख नेते आणि पुणे महानगरपालिका गटाचे माजी नेते पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले भाजपमध्ये सामील झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्व आणि विकासकामांवर विश्वास व्यक्त करीत दोन्ही नेते भाजपमध्ये सामील झाले. ज्यामुळे शहरात भाजपची ताकद आणखी बळकट झाली.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूडमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि येरवड्यातील माजी नगरसेवक संजय भोसले यांनी पत्नी अश्विनी भोसले यांच्यासह भारतीय जनता पक्षात मंगळवारी (दि.23) प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या उपस्थितीत हे प्रवेश करण्यात आले. यावेळी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, महापालिका निवडणूकप्रमुख गणेश बिडकर उपस्थित होते.
पुण्यात काही दिवसांपासून भाजपमध्ये जोरदार इनकमिंग पाहायला मिळत आहे. अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग््रेास पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये काही दिवसांपूर्वी देखील भाजपच्या मुंबई कार्यालयामध्ये पुण्यातील 22 माजी नगरसेवकांनी प्रवेश केला होता. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपनगरांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार हडपसर, वडगाव शेरी आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघातील अन्य पक्षांतील माजी नगरसेवकांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. त्यानंतर कोथरूडमधील शिवसेनेलाही (ठाकरे) भाजपने मोठा धक्का दिला आहे. मुळात कोथरूड भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येथे भाजप नगरसेवकांचे प्राबल्य असूनही पृथ्वीराज सुतार यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. मात्र, या प्रवेशामुळे भाजपमधील इच्छुकांसह निष्ठावंतांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत त्याचे पडसादही उमटण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन निवडणुकांमध्ये आम्ही महाविकास आघाडीचे कर्तव्य पार पाडले. ज्या पक्षाचा आम्ही आयुष्यभर विरोध केला, त्याच काँग््रेाससोबत आम्हाला लोकांकडे जावे लागले. त्यावेळी लोकांनी आम्हाला शिव्या दिल्या आणि हसले. आता महाविकास आघाडीत युतीची जबाबदारी पार पाडण्याची काँग््रेासची पाळी होती. येरवड्यात, जिथे आम्ही भगवा झेंडा फडकवला होता आणि जिथे शिवसेनेचे तीन नगरसेवक होते, तिथे आम्हाला त्या तीन जागांसाठी काँग््रेासचा दरवाजा ठोठावावा लागला. काँग््रेासच्या या वर्तनाला कंटाळून आम्ही भाजपमध्ये सामील होत आहोत. भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि येरवड्यात आम्हाला हिंदुत्वाचे रक्षण करायचे आहे.
संजय भोसले, माजी गटनेते
राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने 123 पेक्षा जास्त जागांवर बाजी मारली आहे, तर दुसरीकडे या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला असून 288 पैकी ठाकरेंच्या पक्षाला फक्त 10 जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाकडून कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मी गेल्या 40 वर्षांपासून कोथरूडमध्ये काम करत आहे. आम्हाला वेळोवेळी भाजपचा पाठिंबा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भारताला एकत्र केले आहे आणि ते ज्या विकासाच्या मार्गावर चालत आहेत. ते पाहून मी भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक
माजी नगरसेवकांची संख्या शून्यावर
2017 च्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे 10 नगरसेवक निवडून आले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एक वगळता सर्व नगरसेवक ठाकरेंसोबत राहिले. तथापि, विधानसभा निवडणुकीनंतर पाच नगरसेवक भाजपमध्ये सामील झाले. संजय भोसले आणि पृथ्वीराज सुतार यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, श्वेता चव्हाण यांनी अलीकडेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग््रेास पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे 2017 मध्ये निवडून आलेल्या 10 नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे राहिलेला नाही.
पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले हे दोघेही वर्षानुवर्षे शहराच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी आश्वासन दिले की, या नेत्यांना भाजपमध्ये सावत्र भावांसारखे नाही, तर आदर आणि चांगली वागणूक मिळेल. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही विश्वास व्यक्त केला की, या प्रवेशामुळे त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात भाजपची ताकद वाढेल आणि कोणाशीही भेदभाव केला जाणार नाही.
मुरलीधर मोहोळ, खासदार व केंद्रीय मंत्री, भाजप