

पुणे: येत्या शैक्षणिक वर्षात ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम घेण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याला तब्बल 65 लाखांचे टार्गेट देण्यात आले आहे. परंतु, राज्यात केवळ पावणेतीन लाख विद्यार्थी, शिक्षक व पालकांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे येत्या 11 जानेवारीपर्यंत संबंधित उद्दिष्ट पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक आणि माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
परीक्षा पे चर्चा 2026 साठी सहभागी होण्यासाठी दि. 1 डिसेंबर 2025 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान https://innovateindia.mygov.in/ या संकेतस्थळावर सहावी ते बारावीचे विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी ऑनलाइन एमसीक्यू स्पर्धा आयोजित केली आहे.
सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच, त्या अनुषंगाने विभागातील, जिल्ह्यातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, प्राचार्य यांना परीक्षा पे चर्चा 9 मध्ये जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच पालकांनी सहभागी व्हावे. यासाठी सूचित करून त्याचा अहवाल संचालनालयास सादर करावा, असे सूचित केलेले होते.
राज्यासाठी परीक्षा पे चर्चा 9 या कार्यक्रमामध्ये एकूण 65 लाख इतके विद्यार्थी, शिक्षक व पालक सहभागी होण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु, आत्तापर्यंत केवळ 2 लाख 78 हजार 535 विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी परीक्षा पे चर्चा 9 कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत, असे सहसचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांनी स्पष्ट केले असून, त्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
उद्दिष्ट साध्य होण्यासाठी https://innovateindia.mygov.in/ या पोर्टलवर नोंदणी पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांची राहील, याची नोंद घ्यावी. त्यासाठी संबंधित जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची व क्षेत्रस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संबंधित उद्दिष्ट पूर्ण करण्याची दक्षता आपल्या स्तरावरून घेण्यात यावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या संचालनालयास पाठवावा, असे देखील डॉ. पालकर यांनी स्पष्ट केले आहे. पावणेतीन लाखांहून 65 लाखांचा टप्पा 20 दिवसांमध्ये गाठायचा असल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांची चांगलीच कसरत होणार आहे.