

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलव्दारे पुढील वर्षी 2026 मध्ये होणाऱ्या विविध सीईटी परीक्षांसाठी आधार कार्ड, अपार आयडी, दिव्यांग कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील वर्षी सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित कागदपत्रे अनिवार्य असल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली आहे.
सरदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, आधार कार्डवर नाव, जन्मतारीख, फोटो, पत्ता, वडिलांचे नाव, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर आदी माहिती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आवश्यक अपार आयडी तयार करणे देखील गरजेचे आहे. ज्या विद्यार्थ्यांना दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करणे गरजेचे आहे, त्या विद्यार्थ्यांना दिव्यांग कार्ड काढणे बंधनकारक आहे.
संबंधित कार्डवर नाव, आधार नंबर, पत्ता, बोनाफाइड प्रमाणपत्र, उच्च पदवी घेतलेले प्रमाणपत्र आदी कागदपत्रे विद्यार्थ्यांकडे आवश्यक आहेत. त्याचबरोबर सीईटीसंदर्भातील माहितीसाठी सीईटी सेलच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे देखील सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.