Latest

सोनू सूद: हा पोरखेळ एकदिवस भाजपवर उलटेल; शिवसेनेची टीका

backup backup

मुंबई, पुढारी ऑनलाईन; 'महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या मागे खोटे आरोप लावणे, राज्यपालांनी वरच्या दबावामुळं १२ आमदारांची नियुक्ती रोखणे, सोनू सूद च्या घरावर आयकर धाड घालणे हे कोत्या मनाचे लक्षण आहे, हे रडीचे डाव आहेत. हा पोरखेळ एकदिवस उलटल्याशिवाय राहणार नाही, ' अशा शब्दांत शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्याशी संबंधित सहा ठिकाणी प्राप्तिकर विभागाने बुधवारी आणि गुरुवारी धाड टाकली.

सोनू सूदच्या घरी व ऑफिसमध्ये छापे टाकल्याने चर्चांना उधाण आले आहे. यावरुन महाविकास आघाडीने भाजपवर जोरदार टीका केली आहे.

तर, शिवसेनेनंही आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

सोनू सूद हा आपलाच माणूस

'करोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सोनू सूद भलत्याच झोतात आला.

गोरगरीबांचा मसीहा, मुंबईतून परराज्यांत जाणारे मजूर वगैरे लोकांचा आधारस्तंभ म्हणून त्याचा बोलबाला सुरु झाला.

बसेस, ट्रेन्स, विमाने बुक करून सोनू सूद मुंबईत अडकलेल्या लोकांना परराज्यांतील त्यांच्या घरी पाठवीत होता.

तेव्हा 'जे सोनूला जमते ते महाविकास आघाडी सरकारला का जमत नाही?' असले पाणचट प्रश्न विचारण्यात आले.

दुसरे म्हणजे सोनू सूदला खांद्यावर घेऊन मिरवणाऱ्यांत भाजप पुढे होता.

सोनू सूद हा आपलाच माणूस असल्याचे त्यांच्याकडून सतत बिंबविण्यात येत होते.

पण या सोनूने दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे 'ब्रॅण्ड ऍम्बेसेडर' म्हणून सामाजिक कार्य करायचे ठरवले.

त्यानंतर त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या आहेत,' असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

'सोनू करोना काळात मजुरांना मदत करीत होता. त्याने देशातील १६ शहरांत ऑक्सिजन प्लांट उभे केले.

स्कॉलरशिपची योजना सुरू केली. त्या माध्यमांतून त्याचा बोलबाला झाला. या कार्यक्रमांना भाजपचे लोकही उपस्थित राहत.

महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांनी सोनूस राजभवनावर बोलावून खास चहापान केले.

तोपर्यंत सोनू हा या मंडळींना आपला, म्हणजे भाजपचा अंतरात्मा वाटत होता.

सोनू महाशय जे महान समाजकार्य करीत आहेत त्यामागे फक्त भाजपचीच प्रेरणा, परंपरा आहे, असे ठासून सांगितले जात होते.

पण सोनूच्या समाजकार्याशी पंजाब, दिल्लीसारख्या सरकारांनी हात मिळविण्याचा प्रयत्न करताच सोनू सूद म्हणजे करबुडवा असे ठरविण्यात आले.'

तपास यंत्रणांच्या भुताटकीने पछाडले

'केंद्रीय तपास यंत्रणांच्या भुताटकीने गेल्या काही महिन्यांत अनेकांना पछाडले आहे.

महाराष्ट्रातील मंत्री अनिल देशमुख, अनिल परब, आमदार प्रताप सरनाईक यांना या तपास यंत्रणांच्या जाळय़ात अडकविण्याचाच डाव आहे.

भाजपचे काही चवचाल पुढारी हे स्वतःच्या बाथरुममध्ये घुसावे तसे रोज 'ईडी' कार्यालयात जाऊन मोकळे होत आहेत.

हा इतका आत्मविश्वास आणि धैर्य वरच्यांच्या पाठबळाशिवाय येणे शक्यच नाही.

कोणीतरी एक गुन्हेगार, बडतर्फ अधिकारी आरोप करतो, त्याच्याकडून 'आरोप' वदवून घेतले जातात व त्यावरहुकूम केंद्रीय तपास पथके भाजपविरोधकांच्या हात धुऊन मागे लागतात.

महाराष्ट्रातील मंत्र्यांनी आता आरोपबाज सोमय्यांवर खटले दाखल करून 'बाप दाखव, नाहीतर श्राद्ध घाल' अशी भूमिका घेतलीच आहे.

राज्य सरकारला बदनाम करायचे, भाजपचे सरकार येनकेन प्रकारे येत नसेल तर तुमच्या सरकारलाही काम करू देणार नाही हे दळभद्री प्रकार सूडबुद्धीने सुरूच आहेत.

जे आमचे चरणदास होणार नाहीत ते आमचे दुष्मन, त्यांना भरडून टाकू, अशा विकृत लोकशाहीचा उदय होणे देशाला मारक आहे,' अशा शब्दांता भाजपला फटकारले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT