गणेश मूर्ती जप्त : गंगेतील मृतदेह, इंधन भाववाढ, विदर्भाच्या अवस्थेवर पुरींच्या गणेशाने केले तिखट भाष्य | पुढारी

गणेश मूर्ती जप्त : गंगेतील मृतदेह, इंधन भाववाढ, विदर्भाच्या अवस्थेवर पुरींच्या गणेशाने केले तिखट भाष्य

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

नागपुरातील चंद्रशेखर गुलाब पुरी यांनी स्थापन केलेली गणेश मूर्ती जप्त करण्यात आली आहे. पोलिसांकडून स्थापनेनंतर तासाभरताच गणेश मूर्ती जप्त करण्यात आली.

नागपुरातील गुलाब पुरी हे गणेशस्‍थापनेच्या निमित्ताने हाताळण्यात येणाऱ्या वादग्रस्त विषयांमुळे राज्यात प्रसिद्ध होते. ५० वर्षांपूर्वी पाचपावली परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गुलाब पुरी यांनी वादग्रस्त देखाव्यातून सामाजिक संदेश देणारा गणेश मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्याची परंपरा सुरू केली.

हा गणपती गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापना न करता गणेशोत्सवा दरम्यानच्या कुठल्याही दिवशी स्थापन केला जातो. गुलाब पुरी यांचे चिरंजीव चंद्रशेखर पुरी यांनी वडिलांचा वारसा पुढे चालवत गुरूवारी सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान पाचपावली उड्डाणपुलाखाली गणेश मूर्तीची स्थापना केली. तासाभरातच पाचपावली पोलिसांनी मूर्ती जप्त करीत चंद्रशेखर पुरी यांना अटक केली.

पूर्वी गुलाब पुरी यांनी गणपतीची स्‍थापना केली की पोलीस लगेच ती गणेश मूर्ती जप्त करायचे. चंद्रशेखर आझाद गणेश मंडळाच्यावतीने पुरी हे गेल्या अनेक वर्षांपासून गणपतीची स्थापना करतात. त्यासोबत ज्वलंत सामाजिक समस्यांवर आधारित देखावेही असतात. १९९३ साली गुलाब पुरी यांचे निधन झाले.

मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींवरही केला होता देखावा

त्यानंतर त्यांचे चिरंजीव चंद्रशेखर, नरेंद्र यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. २००५ साली न्यायालयाने पुरींना गणपतीची प्रतिष्ठापना करू देण्याचे आदेश दिले होते. २०१० साली पुरी यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रतिमा उभारल्या होत्या. त्यामुळे त्यावेळी पोलिसांनी या प्रतिकृती जप्त केल्या होत्या.

तर २०१९ मध्ये ‘प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख जमा होणार होते ते कुठे आहेत’, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारण्यात आला होता. २०२० मध्ये परवानगी नाकारली होती.

२०२१ मध्ये कोरोना काळात गंगेत मोठ्या प्रमाणावर अर्धवट जळालेले मृतदेह फेकण्यात आले, कोरोना महामारीने जनता त्रस्त असतानाच पेट्रोल डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीने सामान्यांना जगणे कठीण झाले आहे. शेतकरी, व्यापारी व मजूरांना कोणी वाली राहिला नाही तर वैदर्भीय नेत्यांच्या मूग गिळून बसण्यावरही तिखट शेरेबाजी करण्यात आली आहे.

Back to top button