संभाजी भिडे गुरुजींनी घेतली मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट | पुढारी

संभाजी भिडे गुरुजींनी घेतली मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

बामणोली : पुढारी वृत्तसेवा

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शिवसेनेचे नेते राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांची त्यांच्या दरे तर्फ तांब ता.महाबळेश्वर या गावी जाऊन भेट घेतली.

दरम्यान कालच खासदार उदयनराजे भोसले यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती व लगेचच दुसऱ्या दिवशी संभाजी भिडे गुरुजी यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षण व सातारा शहरातील विविध विकासकामे याबाबत भेट घेतल्याचे सांगितले मात्र लगेचच दुसऱ्या दिवशी भिडे गुरुजी यांनी भेट घेतल्याने या दोन्ही भेटीमधून नक्कीच वेगळे काय तरी घडणार याची चर्चा आता सुरू झाली आहे.भिडे गुरुजी यांना भेटीबाबत विचारले असता त्यांनी भेटीचे कारण सांगण्यास शांतता बाळगली.

मात्र एका तासाहून अधिक काळ चाललेल्या कमराबंद चर्चेमुळे राजकीय वर्तुळात नक्कीच उलथापालथ होणार की आगामी निवडणूकांमध्ये वेगळंच चित्र पहावयास मिळणार याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहेत.मात्र मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सदिच्छा भेट असल्याबाबत स्पष्ट केले असले तरी आदल्या दिवशी उदयनराजे व लगेचच दुसऱ्या दिवशी संभाजी भिडे गुरुजी या दोन्ही राज्यातील बड्या नेत्यांच्या भेटीने मात्र चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान मंत्री शिंदे यांच्या शेतात संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते फणसाचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी खा.श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते.

Back to top button