Manohar Bhosale : मनोहर भोसलेच्या पोलिस कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ - पुढारी

Manohar Bhosale : मनोहर भोसलेच्या पोलिस कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ

बारामती; पुढारी वृत्तसेवा : संत श्री. बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत बारामतीतील युवकाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात (दि. १०) सप्टेंबरपासून पोलिस कोठडीत असलेल्या मनोहर भोसले (Manohar Bhosale) (वय २९, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्या पोलिस कोठडीत  बारामती न्यायालयाने आणखी तीन दिवसांची वाढ केली. (Manohar Bhosale’s police custody extended for another three days)

११ सप्टेंबर रोजी न्यायालयाने मनोहर भोसले (Manohar Bhosale) याला पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. गुरुवारी (दि. १६) रोजी ती संपल्याने तालुका पोलिसांकडून त्याला न्यायाधीश एन. व्ही. रणवीर यांच्यापुढे  हजर करण्यात आले. मागील वेळी प्रमाणे गुरुवारीही मनोहर भोसले याच्या भक्तानी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती.

भोसले याच्या बाजूने ॲड. हेमंत नरुटे यांनी म्हणणे मांडले. सरकार पक्षाकडून ॲड. एन. पी. कुचेकर यांनी काम पाहिले. मनोहर भोसले याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत, त्यांना अटक करायची आहे, मनोहर भोसलेकडे गुन्ह्यातील रक्कम व अन्य बाबींचा तपास बाकी आहे, त्यामुळे पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी सरकारी वकिलानी केली होती. न्यायालयाने ती मान्य करत त्यात तीन दिवसांची वाढ केली.

शुक्रवारी (दि. १०) सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सालपे येथील एका फार्महाऊसवरून पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मनोहर भोसले याला ताब्यात घेत बारामतीत आणत अटक केली होती.

अघोरी प्रथा व जादूटोणा करण्यात हातखंड्यात भोसलो पटाईत होता

बारामतीतील शशिकांत सुभाष खरात याच्या वडिलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडिलांच्या गळ्यातील थायरॉईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडिलांच्या व फिर्यादीच्या जीविताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी २ लाख ५१ हजार रुपये घेत फसवणूक केली.

पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी भोसलेसह त्याचे साथीदार विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे फरार आहेत. या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा व  उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला होता.

करमाळा पोलीस प्रतिक्षेत

मनोहर भोसले विरोधात करमाळा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. सध्या भोसले हा बारामती तालुका पोलिसांच्या कोठडीत आहे. येथील कोठडी संपल्यानंतर करमाळा पोलीस भोसले याला बलात्काराच्या गुन्ह्यात ताब्यात घेणार आहेत. परंतु बारामतीतील फसवणूक प्रकरणात पोलिस कोठडी वाढल्याने सध्या तरी करमाळा पोलिसाना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Back to top button