पंतप्रधान नरेंद्र मोदी : कणखर, नम्र आणि स्पष्टवक्ते नरेंद्रभाई! | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी : कणखर, नम्र आणि स्पष्टवक्ते नरेंद्रभाई!

‘देखो भाई आपको ये जचेगा की नही मुझे मालूम नही लेकिन आपको बोलना मेरा काम है’, असे म्हणत नम्र, पण स्पष्ट बोलणारे नरेंद्रभाई…, गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून प्रशासनावर जबरदस्त पकड ठेवणारे… ‘कुटुंब ज्या पद्धतीने चालते त्याच पद्धतीने राष्ट्र चालवले पाहिजे’, या विचाराने देशाचा कारभार करणारे… अवघ्या 105 रुपयांत 35 किलो धान्य गरिबांना मिळवून देणारे अन् देशातली एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही, अशी व्यवस्था उभारणारे… आणि आता 2024 नंतरच्या टप्प्यात देशाला प्रचंड वेगाने प्रगतीच्या दिशेने नेण्याची महत्त्वाकांक्षा असलेले नरेंद्रभाई… संघ प्रचारक ते पंतप्रधान हा मोठा प्रवास स्वत: पाहणार्‍या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी उलगडला दै. ‘पुढारी’ला दिलेल्या खास मुलाखतीत.

तुमची आणि नरेंद्र मोदी यांची पहिली भेट कधी झाली?

चंद्रकांतदादा : पंतप्रधान नरेंद्रभाई यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. देशाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. मी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो तो काळ होता 1980 ते 95 चा. महाराष्ट्र, गोवा, गुजरात या प्रांतांचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम मी करत होतो. आणीबाणीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आली; पण अभाविपवर बंदी नव्हती. त्यामुळे आम्ही अनेक आंदोलने केली. गुजरातला 1982 ते 1995 असे सलग 13 वर्षे काम केल्याने संपूर्ण गुजरात मला पाठ आहे. नरेंद्रभाई यांची ओळख साधारणपणे 1982 च्या काळातच झाली.

तेव्हा ते प्रचारक होते. नंतर गुजरात प्रांताची जबाबदारी त्यांच्याकडे आली. त्यावेळेस पार्टी कार्यालयात राहण्याची व्यवस्था होती. त्यामुळे तेथे आम्ही फापडा आणि चहा घेत अनेक रात्री जागून काढत काम केले. आजही त्या आठवणी माझ्या मनात ताज्या आहेत. त्यामुळे संपूर्ण गुजरात कळला. मोदींचीही चांगली ओळख झाली. मोदी 1984 नंतर मात्र राजकारणात खूप सक्रिय झाले. अनेक मोठ्या जबाबदार्‍या त्यांच्याकडे येऊ लागल्या.

मोदींच्या कार्यशैलीबद्दल तुम्ही नेमके काय सांगाल?

चंद्रकांतदादा : नरेंद्रभाईंची कार्यशैली त्या काळात जशी होती तशीच आजही आहे. ‘पोलाईट फर्मनेस’ म्हणजे कणखर नम्रपणा आणि स्पष्टवक्तेपणा ही मोदींची कार्यशैली अगदी सुरुवातीपासून आहे. ‘देखो भाई आपको ये जचेगा की नही मुझे मालूम नही, लेकिन आपको बोलना मेरा काम है’, अशी सुरुवात अत्यंत नम्र, परंतु स्पष्टपणे ते त्यावेळी करत. ती मला आजही आठवते. अजूनही ते त्याच कार्यशैलीने काम करतात. ते कणखर पण नम्रपणे खरे बोलतात. जेव्हा एखादा माणूस नम्रपणे स्पष्टपणे बोलतो तेव्हा ते तुमचे नुकसान टाळण्यासाठी असते. त्यावेळी केशुभाई पटेल यांच्यानंतर त्यांनी गुजरात राज्याची जबाबदारी अत्यंत ताकदीने सांभाळली.

गुजरातमध्ये भाजप रुजवण्यात मोदींचा मोठा वाटा आहे. याकडे तुम्ही कसं पाहता?

चंद्रकांतदादा : संघाचे काम गुजरातमध्ये खूप वर्षांपासून आहे. गुजरातमध्ये चाळीस-पन्नासच्या खाली आमदार कधीच निवडून आले नव्हते. मोदींनी तो आकडा आणखी वर नेला आणि पक्षाने आणखी ताकदीने पाय रोवले. त्यावेळी त्यांची जी कार्यशैली होती तीच आजही आहे.

देशात आज 38 कोटी जनधन खाती सुरू केली. हा एक नवा विक्रम त्यांच्या काळात झाला आहे, त्याला तोड नाही. त्यांचे राजकारण हे जातीविरहित आहे. गुजरातचा त्यांनी कायापालट केला, तसाच आता संपूर्ण देशाचा कायापालट करण्याच्या मागे ते लागले आहेत. गुजरातमध्ये सिमेंटचे रस्ते त्यांनी केले. नर्मदा सरोवर पूर्ण केले. त्यामुळे कच्छ भागांमधून परागंदा झालेली माणसे आता त्या भागात परत येत आहेत. हा मोठा करिश्मा त्यांनी करून दाखवला. मुस्लिम माणसांनादेखील मोठा व्यवसाय त्यांनी मिळवून दिला. आता प्रत्येक माणसाचे सरासरी दरडोई उत्पन्न खूप वाढले आहे. हा मोठा बदल त्यांनी करून दाखवला. दीनदयाळ उपाध्याय यांच्या शिकवणुकीनुसार त्यांचे काम सुरू आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करण्याची तीच पद्धत आजही सुरू आहे. गरिबांच्या कल्याणावर त्यांचा अधिक भर आहे. पंतप्रधान असताना राजीव गांधी असे म्हणाले होते की, केंद्रातून एक रुपया सोडला तर तो खाली येईपर्यंत 15 पैसे पोहोचतात. त्यामुळे पंतप्रधान झाल्याबरोबर नरेंद्र मोदी यांनी सर्व योजना ऑनलाईन पद्धतीने केल्या. त्यामुळे सर्व घोटाळेच कमी झाले.

उद्योगक्षेत्रात मोदींनी गुजरातला वेगळ्या उंचीवर नेले आहे, त्याबद्दल काय सांगाल?

चंद्रकांतदादा : होय. व्हायब्रंट गुजरात नावाचा उपक्रम सुरू करून त्यांनी फार मोठी उद्योग चळवळ उभी केली आणि तिथून गुजरातच्या उद्योगाला प्रचंड मोठा वेग आला. मोदींनी मुख्यतः लायसन्स राज संपवले. ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ हा शब्दच त्यांनी आणला. जसे आपण आपलं घर चालवतो, त्याच प्रकारे मोदी राज्य चालवत. आता देशही ते त्याच पद्धतीने चालवत आहेत. घरात जसा पैसा लागतो, त्याचप्रमाणे देशालाही लागतो, ही त्यांना जाण आहे. ही त्यांची सहज सोपी पद्धत आहे.

मोदींनी चीनसारख्या देशातील पंतप्रधानांना आपल्या राज्यात आणले, हे आजपर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्याला जमले नाही. त्याबद्दल काय सांगाल?

चंद्रकांतदादा : मोठी स्वप्न पाहणे आणि त्याचा पाठपुरावा करून ती पूर्ण करून दाखवणार हा ध्यास मोदींनी सुरुवातीपासून घेतला आणि तो त्यांनी गुजरातमध्ये करून दाखवला. आता तसाच कारभार ते देशासाठी करत आहेत. राज्य कुटुंबाप्रमाणे चालले पाहिजे. तसाच देश आहे, अशी त्यांची धारणा आहे. ही त्यांची सहजता अगदी सुरुवातीपासून मी पाहत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर रात्री झोपण्याच्या आधी राज्याचा कर किती गोळा झाला, याचा आढावा घेत असत. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांची पद्धतदेखील अशीच आहे, आजही त्यांची तीच दिनचर्या आहे.

मोदींची प्रशासनावर प्रचंड पकड आहे, याचे गमक काय?

चंद्रकांतदादा : प्रशासनावर पक्की पकड असेल, तर राज्य सुरळीत चालते. प्रशासनाला आपलेसे करता आले पाहिजे. त्याच्या अनेक साध्या-सोप्या पद्धती मोदींनी रूढ केल्या.अधिकार्‍यांना, साध्या कर्मचार्‍यांनादेखील ते अतिशय प्रेमाने वागवतात. त्यांच्या कुटुंबाबद्दल चौकशी करतात. हा साधा- सोपा उपाय त्यांनी शोधून काढला आणि त्यांनी प्रेमाने त्यांना जिंकून घेतले. ही अतिशय उत्तम पद्धत मोदींची आहे आणि तेच त्यांच्या यशाचे गमक आहे. कधी एखादा आयएएस अधिकारी रात्री दहानंतर काम करत असेल, तर मोदी म्हणतात ‘अरे भाई घर जलदी जाओ, पत्नी राह देखती होगी; उन्हे बाहर घुमाने ले जाते हो की नहीं ?’ त्या उलट आता महाराष्ट्रातच पाहा ना. 19 महिन्यांत एकही अधिकारी नीट एका जागेवर काम करू शकत नाही. त्यांच्या सारख्या बदल्या सुरू आहेत.

2014 च्या लोकसभा निवडणुकीतील करिश्म्याचे वर्णन तुम्ही कसे कराल?

चंद्रकांतदादा : कोणताही पंतप्रधान देशात त्यांच्याएवढा फिरलेला नाही. 542 मतदारसंघांपैकी 300 मतदारसंघ त्यांनी पिंजून काढले. ‘मन की बात’सारखा साधा-सोपा कार्यक्रम आकाशवाणी वरून सुरू केला. आजवर आकाशवाणीचा उपयोग इतक्या सहज, साध्या-सोप्या पद्धतीने कोणत्याही पंतप्रधानांनी केलेला नाही. प्रचंड मोठ्या खंडप्राय देशातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा अतिशय सोपा मार्ग त्यांनी शोधला. सर्वसामान्यांची कामे करण्याचा त्यांनी सपाटा लावला. शौचालय, गॅससारख्या सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या.

2014 च्या निवडणुकीत त्यांनी जो करिश्मा दाखवला, तोच 2019 च्या निवडणुकीत त्यांनी दाखवला. त्यात थ्रीडी तंत्रज्ञान वापरले. इतका हायटेक प्रचार केला तो दुसर्‍या कोणालाही कसा जमला नाही?

चंद्रकांतदादा : मी नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एक गुण प्रकर्षाने पाहिला तो म्हणजे ते प्रत्येक कामासाठी ते सल्ला घेतात. तो सल्ला घेताना ते एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे प्रत्येकाचे ऐकतात आणि मग ते सगळे आत्मसात करून त्याचा पाठपुरावा करतात. त्यांची स्मरणशक्ती प्रचंड आहे. सोशल मीडियाचा वापर त्यांनी प्रचंड वेगाने केला, जो आजवर कुणीही केला नाही. नमो अ‍ॅप, फेसबुक असो, आकाशवाणीवरचे भाषण असो, या मीडियाचा इतका प्रभावी वापर आजवरच्या एकाही पंतप्रधानांनी केला नाही तो मोदींनी केला. त्यांनी लोकांमध्ये विश्वास वाढवला. चांगले नेतृत्व खूप काही करू शकते, हा विश्वास त्यांनी लोकांमध्ये निर्माण केला.

मोदींच्या पहिल्या टर्मचे विश्लेषण तुम्ही कसे कराल?

चंद्रकांतदादा : मोदींनी आपल्या कामाचे तीन भाग केले. पहिला भाग म्हणजे देशासमोरच्या पायाभूत गरजा कोणत्या आहेत, याचा अभ्यास करून शौचालय, बँक अकाऊंट, गॅस हे बहुसंख्य नागरिकांकडे अजूनही नाही, हे त्यांनी ओळखले. दुसर्‍या टप्प्यात त्यांनी विचारधारेवर लक्ष केंद्रित केले. देशावर झालेली आक्रमणे, देशाचा झालेला अपमान, देशभावना यावर त्यांनी विचार करत 370 कलम, राम मंदिर, तलाक याबाबत मोठे निर्णय घेऊन देशवासीयांना एका वेगळ्या दिशेने नेले. सामान्य माणसाची नाळ त्यांनी ओळखली. अवघ्या 105 रुपयांत 35 किलो धान्य आता गरिबाला मिळत आहे. हेच त्यांनी देशाला दिले. आता लोकांचे पोट भरत आहे. आपल्या देशात कुणी उपाशी माणूस नाही. हा खूप मोठा बदल देशात झालेला आहे. त्यामुळे तिसर्‍या टप्प्यात मोदी बाकीचे विषय संपवणार आहेत. देशाला प्रचंड वेगाने त्यांना प्रगतीच्या दिशेने न्यायचे आहे.

नोटाबंदीचा निर्णय प्रचंड धाडसी होता. त्यावर अनेक वादग्रस्त विधाने झाली. याकडे तुम्ही कसे बघता?

चंद्रकांतदादा : नोटाबंदीचा निर्णय काळाच्या ओघात सिद्ध झाला आहे. ज्यांच्याकडे दोन-दोन हजार कोटी रुपये काळ्या पैशांच्या स्वरूपात होते, त्यापैकी बहुसंख्यांना त्यांचे रूपांतर पांढर्‍या पैशांत करता आले नाही. त्यामुळे फार मोठा काळा पैसा बाहेर काढता आला. इतर सर्व कर रद्द करून जीएसटी हा एकच कर आणण्याचा त्यांचा निर्णय अतिशय धाडसी होता. आज 1 लाख 23 हजार कोटींचा जीएसटी गोळा होतो. हा मोठा निर्णय आहे. नोटाबंदीचा निर्णयदेखील योग्य होता, असेच मी म्हणेन. कॅशचे व्यवहार बंद होऊन ते ऑनलाईन झाले. व्यवहारात पारदर्शकता आली.

आता एखाद्याने फ्लॅट घेतला, तर ब्लॅक किती व्हाईट मनी किती, हा प्रकारच बंद झाला आहे. हा मोठा बदल नोटाबंदी आणि जीएसटीनंतर आपल्या देशात पाहायला मिळत आहे. पाकिस्तानबाबतची त्यांची भूमिका अतिशय स्पष्ट होती आणि आहे. त्यांनी दहशतवाद पूर्ण चिरडून काढला आहे. गेल्या सात वर्षांत एकही अतिरेकी हल्ला होऊ दिला नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. याचे कारण त्यांच्यात संघाने जो देशाभिमान रुजवला, हे होते. ते म्हणतात, आपण साधेपणाने राहावे. आपल्या संस्कृतीने साधेपणा शिकवला आहे. तसेच ते वागतात, बोलतात आणि राहतातदेखील.

जनधन, उज्ज्वला योजना या मोठ्या योजना यांनी आणल्या. त्याबद्दल काय सांगाल?

चंद्रकांतदादा : गरिबांसाठीच्या अनेक योजना त्यांनी सुरू केल्या. ते म्हणतात थेट पाईपलाईनद्वारे पाणी आणले पाहिजे. माझ्या भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरला पाहिजे, ही त्यांची भावना आहे आणि प्रत्येक दारात पाईपलाईन आणल्याशिवाय ते राहणार नाहीत. हा त्यांचा पुढचा अजेंडा आहे.

2019 च्या निवडणुकीत काँग्रेस येईल, असा अंदाज अनेक विश्लेषकांनी केला होता; परंतु सर्वांचे अंदाज फोल ठरवत मोठ्या मताधिक्याने मोदी पुन्हा निवडून आले. त्याबद्दल काय सांगाल?

चंद्रकांतदादा : निवडणुकीच्या विजयात जसा नरेंद्र मोदी यांचा वाटा आहे, तसाच तो अमितभाई शहा यांचादेखील आहे. त्यांनी मोदींच्या खांद्याला खांदा लावून संघटनेसाठी काम केले आहे. त्याला तोड नाही. या दोघांचेही योगदान प्रचंड आहे.

येत्या काळात भाजपची काय दिशा राहील ?

चंद्रकांतदादा : रोजगारनिर्मिती हा मोठा अजेंडा मोदी यांच्यापुढे आहे. काही लाख रोजगार येत्या काळात निर्माण केले जातील. देशाची ही मोठी गरज आहे. त्याने क्रयशक्ती वाढेल. देशाची संरक्षण व्यवस्था प्रचंड बळकट करण्यावर त्यांचा भर आहे.

भेटवस्तूंचा लिलाव ही अनोखी कल्पना…

नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्या वेळेपासून ते एक गोष्ट करत आहेत. त्यांना आलेल्या भेटवस्तूंचा ते लिलाव करीत. त्यातून आलेल्या पैशांवर त्यांनी एक सामाजिक संस्था चालू केली. त्याचे ट्रस्ट करून त्यातून अनेक सामाजिक उपक्रम सुरू केले. त्यांनी एक एज्युकेशन ट्रस्ट तयार करून संस्कार धाम नावाचे विद्यालय सुरू केले. आज अतिशय समर्थपणे ते गुजरातमध्ये सुरू आहे. एक मुख्यमंत्री असे काम जेव्हा करतो तेव्हा समाजात नक्कीच एक मोठा संदेश जातो. असेच काम प्रमोद महाजन यांनी रामभाऊ म्हाळगी संस्थेच्या माध्यमातूनदेखील केलेले आहे.

Back to top button