आरोग्यमंत्री टोपे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार | पुढारी

आरोग्यमंत्री टोपे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात राज्याचे आरोग्यमंत्री या नात्याने मराठवाड्याचे सुपुत्र असलेले राजेश टोपे यांनी मोलाचे कार्य केले आहे. आरोग्यमंत्री टोपे यांनी दाखवलेली कार्यतत्परता कौतुकास्पद आहे. परिषदेच्या वतीने त्यांच्या प्रशंसनीय कामगिरी बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आरोग्यमंत्री टोपे यांना मराठवाडा भूषण पूरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मराठवाडा जनविकास परिषदेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत जनहितासाठी व जनविकासासाठी भरीव कामगिरी करणार्‍या मराठवाड्यातील व्यक्तींना मराठवाडा भूषण व रत्न असे पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

यंदाचा पुरस्कार सोहळा आज (17 सप्टेंबर) मराठवाडा मुक्तीदिनी ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती मराठवाडा जनविकास परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी दिली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, परिषदेचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, सचिव डॉ. अविनाश भागवत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

डॉ. अमोल गीते यांनाही आरोग्य क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी मराठवाडा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. डॉ. गीते हे असंख्य मोफत आरोग्य शिबिरे घेऊन जनजागृती करत आहेत.

मराठवाड्याचे सुपुत्र चैतन्य भंडारे यांनी टोकियो येथे नुकत्याच पार पडलेल्या पॅराऑलिम्पिक संयोजन समितीचे प्रतिनिधी म्हणून यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनाही परिषदेच्या वतीने मराठवाडा रत्न पुरस्कार प्रदान होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या वशिमा शेख यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. या परीक्षेत खुल्या प्रवर्गातून त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला. सध्या त्या उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांची मराठवाडा रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

कोंडाबाई भोसले यांचीही निवड

मुलांना बंजारा बोली भाषेतून शिक्षण देण्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात संशोधन करून इंटरनेट शिवाय वापरता येतील अशा तब्बल 51 शैक्षणिक अ‍ॅप्सची निर्मिती केली आहे. निराधार वृध्द आणि मुलांचा सांभाळ करणार्‍या मनोज पांचाळ यांना सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल मराठवाडा रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रातील भरीव संशोधना बद्दल उमेश खरात यांना मराठवाडा रत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल.

मेडिसिन अतिदक्षता विभागात कार्यरत कोंडाबाई भोसले यांनी कोरोना काळात रूग्णांची सेवा केली, त्यांचीही या पुरस्कारासठी निवड झाली आहे. तसेच डॉ. अमरदीप गरड यांच्या कार्याची दखल घेवून तेही मराठवाडा रत्नने सन्मानित होणार असल्याची माहिती टेकाळे यांनी दिली.

Back to top button