पुणे : नारायणगाव, वारूळवाडी येथे ओमायक्रॉनचा शिरकाव | पुढारी

पुणे : नारायणगाव, वारूळवाडी येथे ओमायक्रॉनचा शिरकाव

नारायणगाव (जि. पुणे) : पुढारी वृत्तसेवा

पुणे-नाशिक महामार्गावरील मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या नारायणगाव शहरात कोरानाच्या ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव झाला आहे. वारूळवाडी येथे चार तर नारायणगाव मध्ये तीन रुग्ण आढळले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ यांनी दिली.
नारायणगावमध्ये ओमायक्रॉनचे रूग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजाराची लक्षणे जरी सौम्य असली तरी नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. गुंजाळ यांनी सांगितले की, नारायणगाव येथील एकूण १६ रहिवासी दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथून ते परत आल्यानंतर सर्वांचे आरटीपीसीआर नमुने घेण्यात आले. हे नमुने दि. १२ डिसेंबर रोजी पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले. त्यापैकी एकूण ७ व्यक्तींचे नमुने शुक्रवारी (दि. १७) ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले.

या सर्व रुग्णांना ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे दाखल करण्यात आले आहे तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचे नमुने प्राथमिक आरोग्य केंद्र वारुळवाडी येथे घेण्यात आलेले आहे व पुढील तपासणीसाठी पुणे येथे पाठविले आले आहेत

ओमायक्रोन या विषाणूच्या आजाराची लक्षणे सौम्य जरी असली तरी नागरिकांनी दक्षता घेणे अतिशय गरजेचे आहे. मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे, लक्षणे दिसल्यास त्वरीत सरकारी रुग्णालयात संपर्क करणे तसेच गर्दीत जाणे टाळायला हवे. नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात न घालता शासनाच्या नियमांचे पालन करावे

– डॉ वर्षा गुंजाळ, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, वारूळवाडी

हेही वाचा

Back to top button