औरंगाबाद : सिल्लोडमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले; एकजण जागीच ठार | पुढारी

औरंगाबाद : सिल्लोडमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले; एकजण जागीच ठार

सिल्लोड; पुढारी वृत्तसेवा

सिल्लोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रक चालकाने दुचाकी स्वारास चिरडले या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. पुंडलिक ठकुबा सुसर (वय ५५ वर्ष रा. मांडणा ता. सिल्लोड) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
जळगाव कडून जालन्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच ३२ आर जे ६११५ ने मांडणा येथून सिल्लोड कडे जाणाऱ्या बजाज सीडी १०० मोटार सायकल क्रमांक एम. एच. २० एफ एफ २३१० ला जोरदार धडक दिली. सुसर दाम्पत्य मोटार सायकलवरून काही कामानिमित्त सिल्लोड कडे जात होते.

सुसर हे शेतकरी असून सिल्लोडचे माजी आमदार सांडू पाटील-लोखंडे यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करत होते. त्यांच्या मागे दोन मुलं, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. मृत पुंडलिक सुसर यांची परिस्थिती हलाखीची असून, ते शेतकरी आहे. कुटूंबाच्या उदर निर्वाहासाठी ते माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांच्या वाहनावर कधी कधी चालक म्हणूनही काम करत होते.

सदरील अपघात इतका भीषण होता की त्यात पुंडलिक सुसर यांच्या मेंदू व शरीराच्या काही भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. या घटनेची माहिती सिल्लोड शहर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे पोलीस कर्मचाऱ्या सहित घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. तसेच अपघातग्रस्त ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतले.

आंबेडकर चौकात सिग्नल व गतिरोधक बसवण्याची मागणी

या ठिकाणी गतिरोधक तयार करण्याबरोबरच सिग्नल यंत्रणा आणि वाहतूक पोलीसांची नेमणूक करावी अशी मागणी केली जात आहे. या ठिकाणी रस्त्याकडेला काही फळ विक्रेते गाड्या लावतात. तसेच जालना, औरंगाबाद, जळगाव, व सिल्लोड शहरातून जाणारी सर्व वाहनेही या चौकातूनच जात असल्याने याठिकाणी लहान-मोठे अपघात होत असतात.

हेही वाचा

Back to top button