अखेर शेतकऱ्यांना न्याय मिळाला, बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया | पुढारी

अखेर शेतकऱ्यांना न्याय मिळाला, बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क

राज्यात बैलगाडी शर्यती घेण्यास सुप्रीम कोर्टाने आज सशर्त परवानगी दिली. या निर्णयावर मंत्री, नेते आणि शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. बैलगाडी शर्यती हा राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा विषय होता. बैलगाडी शर्यतीवर बंदी आल्याने शेतकऱ्यांनी आपल्या आनंदाला मुरड घातली होती. पण अखेर त्यांना न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारने बैलगाडी शर्यतीसाठी पाठपुरावा केला. खासदार अमोल कोल्हे यांनी बैलगाडी शर्यतासाठी आग्रह लावून धरला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही प्रयत्न केले. यासाठी दिल्ली वाऱ्या केल्या. यावरुन राजकारणही झाले. पण अखेर शेतकऱ्यांना न्याय मिळाला. मी या निकालावर समाधानी आहे. बळाराजी आनंदी आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. ”आपल्या महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा भिर्र होणार…ही आनंदाची बातमी आहे.” असे कोल्हे यांनी म्हटले आहे.

बैलगाडी शर्यतीवर घातलेली बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली. या निर्णयामुळे राज्यातील बैलगाडी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button