

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मनसेतील वादाला कंटाळून पक्षाला रामराम ठोकणाऱ्या फायरब्रँड नेत्या माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांनी अखेर आपण राष्ट्रवादी कँाग्रेसच्या तंबुत दाखल होत असल्याचे ट्विटरवरून जाहीर केले आहे.
स्थानिक नेत्यांच्या राजकारणाला कंटाळून रुपाली पाटील यांनी बुधवारीच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते. मात्र आपण नेमके कुठे जाणार हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. अखेर गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी ट्विटरवरून राष्ट्रवादी कँाग्रेसमध्ये जात, महाविकास आघाडीत स्थिरावणार असल्याचे जाहीर केले आहे.
रुपाली पाटील यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, 'आज शरद पवार साहेबांना आशिर्वाद देऊ शकतील असे 'हात' नाहीत व पवार साहेब झुकून नमस्कार करतील असे 'पाय' दिसत नाहीत. हो म्हणूनच ठरलय! या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार…!'
रूपाली पाटील यांनी पक्ष सोडल्या मुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेतील काही नेत्यांच्या अंतर्गत राजकारणाला कार्यकर्त्यांचा मोठा विरोध आहे. त्यामुळे त्यात बदल न झाल्यास मनसेला भविष्यकाळात आणखी धक्के बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा