Nagpur Legislative Council election : नागपुरात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी, काॅंग्रेसची मते फुटली | पुढारी

Nagpur Legislative Council election : नागपुरात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विजयी, काॅंग्रेसची मते फुटली

नागपूर; पुढारी वृत्तसेवा

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर विधानपरिषदेच्या (Nagpur Legislative Council election) निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३६२ मते घेत विजय मिळवला आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली आहेत तर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार छोटू भोयर यांना केवळ १ मत मिळाले. महाविकास आघाडी सरकारमध्ये सामिल असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मते फुटली असल्याचे प्रारंभी चित्र आहे.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघासाठी मतदान पार पडले. निवडणूक आयोगानं सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यापैकी चार जागा बिनविरोध पार पडल्या. तर नागपूर आणि अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे. अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात लढत झाली. तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसला ऐनवेळी उमदेवार बदलण्याची नामुष्की आली. छोटू भोयर यांच्या जागेवर आता अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा देण्यात आला होता.

नागपुरात भाजपाने (Nagpur Legislative Council election) चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिली होती. तर भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक डॉ. रवींद्र उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले होते. काँग्रेसनं थेट पक्षाचा नगरसेवक फोडून त्यांना उमेदवारी दिल्यानं भाजपनं आपले नगरसेवक सहलीवर पाठवले. मतदान फुटू नये म्हणून भाजपकडून सतर्कता बाळगण्यात आली होती. मात्र, मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पत्रक काढत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. या घटनेमुळं नागपूर विधान परिषद मतदारसंघात सुरुवातीपासूनच भाजपचं वर्चस्व दिसले.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : वास्तुकलेचा उत्तम नमुना हुमायूँचा मकबरा | Humayu Tomb Travel vlog

Back to top button