बळीराजासमोर संकट, खतांच्या किमतीत २७० पासून ४९० रुपयांपर्यंत वाढ | पुढारी

बळीराजासमोर संकट, खतांच्या किमतीत २७० पासून ४९० रुपयांपर्यंत वाढ

नानीबाई चिखली : भाऊसाहेब सकट

रासायनिक खतांसाठी लागणार्‍या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाली आहे. खत कंपन्यांनी दरवाढ केल्यामुळे शेतकर्‍यांना त्याचा आर्थिक फटका बसत असून, शेतकर्‍यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्यात पूरस्थितीचा, तर काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाचा बसलेला फटका यामुळे हैराण झालेला शेतकरी त्यातून अद्याप सावरलेला नाही. अशातच शेतकर्‍यांसमोर आता खत दरवाढीचे संकट उभे ठाकले असून, बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

दीड वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकर्‍यांना पीक कर्जासाठी बँका, सोसायट्या यांच्याकडून कर्ज पदरात पाडण्यासाठी धडपड करावी लागली. त्यातच आता खतांच्या किमतीत 270 पासून 490 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. जास्तीचे पैसे मोजून खते विकत घेण्याशिवाय आता शेतकर्‍यांसमोर पर्यायही राहिलेला नाही. युरिया व डीएपी खताचे भाव जरी वाढले नसले, तरी रब्बीसाठी लागणार्‍या खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खताच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम भारतातील बाजारपेठेवर झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते.

खताचे नाव वाढ

सुफला – 15:15:15 270

ईफ्को – 10:26:26 295

ईफ्को – 12:32:16 295

महाधन – 24:24:0 490

 

 

शेतकर्‍यांना सर्व बाजूंनी घेरण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. एफआरपीमध्ये फक्त 50 रुपयांची वाढ केली; पण दुसर्‍या बाजूने खतांची दरवाढ करून ती काढून घेण्याचे काम केले.
– जनार्दन पाटील,
जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

गेल्या एक महिन्यापासून पन्नास रुपयांच्या पटीत दरवाढ सुरू झाली. एका कंपनीनंतर दुसर्‍या कंपनीने दरवाढ करत करत आज जवळपास 270 रुपयांपासून 490 रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे.
– नरेंद्र देसाई, खत व्यापारी, कोल्हापूर

Back to top button