सातारा : वर्ये पूल धोकादायक; लोखंडी रेलिंग तुटले, वाहन नदीत कोसळण्याची भीती | पुढारी

सातारा : वर्ये पूल धोकादायक; लोखंडी रेलिंग तुटले, वाहन नदीत कोसळण्याची भीती

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा-पुणे जुन्या महामार्गावर सातार्‍याजवळ असलेला वर्ये पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या पुलावर संरक्षणासाठी उभारलेले लोखंडी रेलिंग तुटले असून यू टर्नमुळे येथे वेगातील वाहन थेट नदीत कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे याठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

वर्ये पूल हा जुन्या महामार्गावरील डेंजर स्पॉट बनला आहे. या मार्गावरून पुणे-मुंबईच्या दिशेने वाहतूक होत असते. त्याचबरोबर स्थानिक वाहनांचे प्रमाणही मोेठे आहे. मात्र, वर्ये पुलावर अनेक समस्या ठाण मांडून बसल्या आहेत. या पुलालगत कचरा डेपो बनला होता. कुणीही येवून येथे कचरा भिरकावून जात होते. याबाबत आवाज उठवल्यानंतर येथील स्वच्छता करण्यात आली. मात्र, या पुलावरील समस्या काही कमी होत नाहीत. सध्या पुलाला लागून असलेले लोखंडी रेलिंग तुटले आहेत.

युटर्नच्या तोंडावरच ही मोडतोड झाली आहे. त्यामुळे सातारच्या बाजूकडून जाणारे वाहन अतिवेगात असेल तर ते नदीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

SRPF Exam : एसआरपीएफच्या लेखी परीक्षेतील डमीला ठोकल्या बेड्या

मुळात यूटर्न असलेल्या याठिकाणी सुरक्षितेच्या पुरेशा उपाययोजना केलेल्या नाहीत. तसेच हा अरुंद पूल असल्याने या ठिकाणी अपघाताचा धोका अधिक संभवतो. या पुलाचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. बर्‍याचदा समोरून वेगाने येणारी वाहने ऐकमेकांवर धडकण्याचा धोका आहे. त्यातच या पुलावरील रस्त्याकडेला असणारे लोंखडी रेलिंग तुटलेले असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

पुलाचे रुंदीकरण कधी होणार?

वर्ये पुलाच्या रुंदीकरणाबाबत अनेकदा आवाज उठवला आहे. परंतु, लालफीतीतील कारभारामुळे या पुलाचे रुंदीकरण रखडले आहे. या मार्गावरुन वाहनांची व नागरिकांची ये -जा मोठया प्रमाणत असते. परिसरात नागरीवस्तीही अधिक आहे. सुरक्षितेच्या द‍ृष्टीने लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थ व नागरिकांमधून होत आहे. या परिसरात वाढलेल्या शैक्षणिक संस्थांमुळे या पुलावरून विद्यार्थ्यांचीही ये-जा वाढली असून त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

वर्ये पूल मुळात अरुंद आहे. येथील यू टर्न व सुरक्षेच्या तुटपुंज्या उपाययोजना अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. पुलालगतचे लोखंडी रेलिंग तुटल्यामुळे वाहने नदीपात्रात पडण्याचा धोका आहे. रात्रीच्या वेळी या परिसरात संपूर्ण अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे तुटलेले रेलिंग दिसून येत नाही. त्यामुळे या परिसरात ठिकठिकाणी रिफ्लेक्टर लावणे आवश्यक आहे.

– श्रीरंग काटेकर, सातारा

हेही वाचा

Back to top button