रत्नागिरी : ‘मग संजय राऊतांनी ५५ लाख ईडीला का परत केले?’ : किरीट सोमय्या | पुढारी

रत्नागिरी : 'मग संजय राऊतांनी ५५ लाख ईडीला का परत केले?' : किरीट सोमय्या

दापोली; पुढारी वृत्तसेवा: चोरी केली नाही, लबाडी केली नाही, चोरीचा माल नव्हता मग शिवसेना नेते संजय राऊतांनी ५५ लाख ईडीला का परत केले? असा सवाल भाजपाचे नेते किरीट सोमय्या केला. तर राऊत यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी याचे उत्तर द्यावे, असे आव्हान भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना केले.

दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनारी सोमवारी (दि. १३) रोजी सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या वादग्रस्त कामांना भेट देण्यासाठी किरीट सोमय्या आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी थेट ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ठाकरे सरकारमधील अजून अनेक मंत्र्यांचे घोटाळे आपण बाहेर काढणार आहोत, तसेच संजय राऊतांनी ५५ लाख ईडीला का परत केले? असे ते यावेळी म्हणाले.

मुरूड येथील बेकायदेशीर बांधकामाची बिनशेती परवानगी रद्द व्हावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीच ही कारवाई केली आहे, असा दावा सोमय्या यांनी केला. या प्रकरणातील एसडीओ यांच्यावरदेखील कारवाई होत आहे, असे देखील सोमय्या यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीमध्ये असणारे डाटा ऑपरेटर यांना पंधरा हजार पगार दाखवला जातो. मात्र, प्रत्यक्षात त्यांना सात ते आठ हजार पगार दिला जातो. मात्र प्रत्यक्ष पाहिले तर महिन्याला दोन हजारांचे काम होते. मग बाकी पैसे जातात कुठे? याची देखील आपण चौकशी लावणार आहे. यात राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचा देखील समावेश आहे, असा आरोप यावेळी सोमय्या यांनी केला.

यावेळी सोमय्या यांनी दापोली पोलिस ठाणे येथे भेट देऊन पोलिस निरीक्षकांशी चर्चा केली. त्यानंतर तहसीलदारांची भेट घेत मुरूड ग्रामपंचायत येथे जाऊन येथील बेकायदेशीर बांधकामांवर कधी कारवाई करणार? अशी विचारणा केली. यावेळी येथील ग्रामसेवक कार्यालयात हजर नसल्याने सोमय्या यांना योग्य माहिती मिळू शकली नाही.

हेही वाचलंत का? 

Back to top button