Sanjay Raut vs Trollers : शरद पवारांना यासाठी खुर्ची आणून दिली, संजय राऊत टीकाकारांवर भडकले | पुढारी

Sanjay Raut vs Trollers : शरद पवारांना यासाठी खुर्ची आणून दिली, संजय राऊत टीकाकारांवर भडकले

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : Sanjay Raut vs Trollers : शिवसेना खासदार संजय राऊत आणि खासदार शरद पवार हे निलंबित १२ खासदारांना भेटण्यासाटी गेले होते. यावेळी खासदार राऊत पवारांना एक खुर्ची आणून देतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. दरम्यान यावरून खासदार राऊत सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होताना दिसत आहेत. यावर राऊत यांनी नेटकऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.

ज्येष्ठांचा आदर करणे हा आमच्यावर झालेला संस्कार आहे. प्रत्येक ठिकाणी राजकारण करणं बंद करा, असे राऊत यांनी खडसावले. आम्ही १२ निलंबीत खासदारांच्या आंदोलनस्थळी गेलो होतो, यावेळी आमच्यासोबत शरद पवारही होते. ते ज्येष्ठ आहेत. त्यांना मांडी घालून बसता येत नसल्याने त्यांच्या ज्येष्ठतेचा आदर करत मी खुर्ची दिली.

Sanjay Raut vs Trollers : सन्मान करणे हा आमच्या संस्काराचा भाग

सन्मान करणे हा आमच्या संस्काराचा भाग आहे. यावरून कोणाला राजकारण सुचत असेल तर ती संस्कृती नसल्याचे राऊत म्हणाले. ही विकृती आहे अशा शब्दांत राऊतांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.

शरद पवारांच्या जागी लालकृष्ण अडवाणी असते, तरीही मी त्यांना खुर्ची दिली असती. मुरली मनोहर जोशी, मुलायम सिंह यादव, लालू प्रसाद यादव असते तरीही मी त्यांना खुर्ची आणून दिली असती. कारण समोरच्या व्यक्तीला बसण्यासाठी पाट द्यावा असं आपली संस्कृती सांगते.

शरद पवार, लालकृष्ण अडवाणीही पितृतुल्य व्यक्तिमत्व

ज्यांनी लालकृष्ण अडवाणी यांना बसण्यासाठी खुर्ची सोडा, समोर उभंही राहू दिले नाही, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नयेत, असे म्हणत राऊतांनी नाव न घेता पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. शरद पवार, लालकृष्ण अडवाणी ही पितृतुल्य व्यक्तिमत्व आहेत. बाळासाहेब ठाकरे हे माझे गुरू आहेत. यशवंतराव चव्हाण यांना मी आदर्श मानतो. ज्येष्ठांचा आदर करावा हा संस्कार मला बाळासाहेबांकडून मिळाला आहे. प्रत्येक ठिकाणी ज्यांना केवळ राजकारण दिसतं, त्यांनी त्यांच्या डोक्यातला कचरा साफ करावा. अन्यथा राज्यातील जनता तुम्हाला डंम्पिंग ग्राऊंडमध्ये गाठेल. असेच प्रकार सुरू ठेवलेत, तर राज्यात तुमचं सरकार कधीच येणार नाही, अशा शब्दांत राऊत यांनी विरोधकांना सुनावले आहे.

Back to top button