Diogo Alves : ७० माणसांची हत्या करणाऱ्याचं मुंडकं १५० वर्षांपासून का जतन करून ठेवलंय?  | पुढारी

Diogo Alves : ७० माणसांची हत्या करणाऱ्याचं मुंडकं १५० वर्षांपासून का जतन करून ठेवलंय? 

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपण आतापर्यंत पाहिलं होतं की, फार पूर्वी माणसांच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह ममीमध्ये ठेवला जात होता आणि त्यातून त्याचं संरक्षण केलं जातं. त्याची व्यवस्थित काळजीदेखील घेतली जात होती. याचे पुरावे आजदेखील आपल्याला पुरातत्व खात्यांमध्ये सापडतात. असं असलं तरी, इतिहासात अशीही व्यक्ती होऊन गेली आहे, त्याने गुन्हेगारीच्या विश्वात ७० पेक्षा जास्त लोकांची हत्या केली आहे. त्या खुन्याचा चेहरा (Diogo Alves) आजदेखील आपल्याला पाहायला मिळतो. एक नाही, दोन नाही, तर तब्बल १५० वर्षांपासून त्याचं मुंडकं एका बाटलीमध्ये बंद करून ठेवलं आहे. नेमकी कोण आहे ही व्यक्ती? जाणून घेऊ या…

या सीरियल किलरचं नाव आहे डिओगो एल्वेस. त्याचं मुंडकं कापून शास्त्रज्ञांनी मागील १५० वर्षांपासून एका प्रयोगशाळेत जतन करुन ठेवलं आहे. डिओगो एल्वेस हा स्पेनमधील गॅलेसिया नावाच्या शहारात एक सामान्य माणूस म्हणून राहत होता. १८१० मध्ये डिओगो एल्वेस हा नोकरीच्या शोधात आला होता. पण, त्याच्या पदरी निराशा पडली. कुठेच त्याला नोकरी लागली नाही. तो लिस्बन शहरात आला, तिथे नोकरी शोधण्याचा प्रयत्न करू लागला. तिथेही त्याच्या वाट्याला निराशाच आली.

Serial Killer

शेवटी, नोकरीचा शोध घेऊन तो वैतागला आणि त्याची पावले गुन्हेगारी विश्वाकडे वळली. सुरुवातीला तो छोट्या-छोट्या चोऱ्या आणि लोकांना लुटण्याचं काम करू लागला. हळूहळू तो सराईत चाेरटा झाला. त्याने लोकांना लुटण्याचा एक अड्डा तयार केला. तो अड्डा होता लिस्बन शहारातील असणाऱ्या नदीच पूल. या पुलावरून दिवसभर शेतात काम करून घरी परतणारे शेतकरी जात-येत असतं. डिओगो एल्वेस याच पुलावर लपून बसत असे. हीच संधी साधत त्या शेतकऱ्यांना लुटत असे. मात्र, तो शेतकऱ्यांची लुटमार करून थांबत नसे तर त्यांची हत्या करून पुलावरून नदीमध्ये फेकून देत असे.

लोकांना आणि पोलिसांना वाटत असे की, आर्थिक अडचणींना वैतागून हे शेतकरी नदीमध्ये उडी टाकून आत्महत्या करत असतील. मात्र, नंतर पोलिसांच्या लक्षात आले की, त्यांच्या मृतदेहांवर धारदार शस्त्राने वार केलेले सापडले. त्यावरून पोलिसांना शंका आली. पोलिसांनी शोध सुरू केला. तसा डिओगो एल्वेस गायब  झाला. सुमारे तीन वर्षं तो गायब होता. तो या काळात पोलिसांचा तपास शांत होण्याची वाट पाहत होता. पण, या काळात तो शांत बसून नव्हता. तर, त्याने या तीन वर्षांमध्ये स्वतःची एक गॅंग तयार केली. त्या गॅंगमधून तो मोठ्या लुटीचे स्वप्न पूर्ण करणार होता. खरंतर तो एका मोठ्या लुटमारीचं नियोजन करत होता.

Serial Killer

या नियोजनासाठी वर्षभरात त्याने मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे खरेदी करून ठेवली होती. त्याच वर्षभरात पुन्हा त्याने किमान डझनभर लोकांची हत्या केली होती. एके दिवशी डिओगो एल्वेसने आपल्या गॅंगसोबत  लिस्बन शहारातील एका डाॅक्टरच्या घरात घुसून चोरी करत त्यांची निर्घृण हत्या केली. पोलिसांपासून वाचण्यासाठी शेजारच्या जंगलात लपून बसला. पोलिसांना त्यांना डिओगो एल्वेसच्या गॅंगची माहिती मिळाली, पण त्यांचे लपण्याचे ठिकाण सापडत नव्हते. शेवटी१८४१ मध्ये पोलिसांना डिओगो एल्वेसला पकडण्यात यश मिळाले.

सखोल चौकशीत डिओगो एल्वेस याने ७० लोकांची क्रूरपणे हत्या केली होती. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. डिओगो एल्वेसला जेव्हा फाशी देण्यात आली तेव्हा पोर्तुगालमध्ये फ्रेनोलाॅजी म्हणजे मस्तिष्क विज्ञान हा विषय चांगलाच प्रसिद्ध होता. त्यामुळे शास्त्रज्ञ गुन्हेगारांच्या मेंदूचे संशोधन करत होते. ज्यामध्ये माणसाचे व्यक्तीत्वाचा शोध घेतला जात होता. त्यामुळे पोर्तुगालच्या शास्त्रज्ञांनी कोर्टात सीरियल किलर डिओगो एल्वेसच्या (Diogo Alves) मुंडक्याची मागणी केली.

कोर्टाने डिओगो एल्वेसच्या (Diogo Alves) फाशीनंतर त्यांचं मुंडकं कापून या फ्रेनोलाॅजीच्या शास्त्रज्ञांना संशोधनासाठी द्यावे, असा आदेश दिला. असं असलं तरी डिओगो एल्वेसच्या मुंडक्यांचा अभ्यास करूनदेखील विशेष असं काही शोध लागला नाही. कदाचित भविष्यात वेगळा काही शोध लागेल त्यासाठी डिओगो एल्वेसचं मुंडकं एका रसायनयुक्त बाटलीमध्ये जतन करून ठेवलं आहे. लिस्बनमधील एका विद्यापीठात सीरियल किलर डिओगो एल्वेसचं मुंडकं जपून ठेवण्यात आलं आहे.

पाहा व्हिडिओ : आईचे तुकडे करणारा नराधम फासापर्यंत कसा पोहोचला?

Back to top button