निरोपाच्या दिवशी मराठी साहित्य संमेलनातही कोरोनाची एन्ट्री ! दोन पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ | पुढारी

निरोपाच्या दिवशी मराठी साहित्य संमेलनातही कोरोनाची एन्ट्री ! दोन पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात सुरू असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी पुण्याहून आलेले दोन प्रकाशक कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी महापालिकेची धावपळ सुरू झाली आहे. या दोन व्यक्तींना बिटको रुग्णालयामध्ये किंवा पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला कळवून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहे. साहित्य संमेलनासाठी दररोज हजारो श्रोते तसेच व्हीआयपी व्यक्ति येण्याची शक्यता असल्यामुळे महापालिकेने तपासणीसाठी वैद्यकीय विभागाचे पथक ठेवले होते.

पथकामार्फत शुक्रवार, शनिवार व आज रविवार दिवस तपासणी केली जात आहे. दरम्यान,  रविवारी सकाळी पुण्याहून आलेल्या दोन पुस्तक प्रकाशकांच्या कोरोना चाचण्या बाधित झाल्यामुळे वैद्यकीय विभागाची धावपळ उडाली. यातील एक पिंपरी चिंचवड तर दुसरा आळंदी येथील असून आता या प्रकाशकांच्या संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

त्यांचा देखील कोरोना चाचण्या केल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. दरम्यान या दोन्ही कोरोना बाधित व्यक्तींना तीव्र लक्षणे नसल्यामुळे त्यांना गाडीने घरगुती अलगीकरणासाठी पुण्याला पाठवले जाणार असून त्यांची माहिती पुणे महापालिकेला कळविले जाणार असल्याची माहिती डॉ. विजय देवकर यांनी दिली.

१९० संशयितांची तपासणी

ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आणि ज्यांना कोणतीही लक्षणे नाही अशा व्यक्तींना थेट थर्मल स्कॅनिंग द्वारे प्रवेश दिला जात आहे. मात्र ज्यांना लक्षणे आहे अशा जवळपास १९० लोकांची महापालिकेने तपासणी केली. शुक्रवारी ३७ तर  शनिवारी १५३ लोकांची तपासणी केल्यानंतर त्यात एकही बाधित आढळला नाही. तर रविवारी केलेल्या तपासणीत दोन प्रकाशक बाधित आढळून आले.

हे ही वाचलं का?

Back to top button